ठाणे : उल्हासनगरच्या कॅम्प १ भागातून सोमवारी रात्री आकाश संचेरिया भाजी विक्रेता तरुण त्याचा मित्र भरत उर्फ सोनू पाटडीया याच्यासोबत तीन चाकी टेम्पोने जात होता. यावेळी त्यांच्या मागून करण जसुजा हा तरुण दुचाकीवरून आला आणि त्याने या टेम्पोसमोर दुचाकी आडवी लावत तुम्ही माझ्या दुचाकीला धडक दिल्याचा आरोप केला. तसंच टेम्पो चालवत असलेल्या आकाश संचेरिया याला त्याने मारहाण करायला सुरुवात केली. त्यामुळे भरत उर्फ सोनू पाटडीया हा मध्ये पडला असता करण जसुजा याने त्याला खाली पाडून मारहाण केली. या मारहाणीत जागीच बेशुद्ध पडलेल्या भरत उर्फ सोनू पाटडीया याला रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
याप्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. दुचाकी चालक हा अनोळखी असल्यानं त्याचा माग काढता येत नव्हता. मात्र उल्हासनगर पोलिसांनी आपलं नेटवर्क वापरून अवघ्या ५ तासात दुचाकीचालक करण जसुजा याला बेड्या ठोकल्याची माहिती परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे.
दुचाकीचालक करण जसुजा याच्यावर यापूर्वी कोणते गुन्हे दाखल आहेत का? याचा तपास पोलिसांकडून सध्या सुरू आहे. कोणताही धागादोरा अवघ्या काही तासात उल्हासनगर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्याने पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक होत आहे.