ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघातील लढत निश्चित होत नसली तरी चार लाख तरुण मतदारांच्या हातात ठाण्याचा ठाणेदार निवडण्याची किल्ली आहे. परिणामी सर्वच पक्षांनी आपला मोर्चा या मतदारांकडे वळवला आहे.
कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, बेलापूर, ऐरोली, माजिवडा-मानपाडा आणि मीरा-भाईंदर या सहा मतदार संघाचा मिळून ठाणे लोकसभा मतदार संघ तयार झाला आहे. या मतदारसंघात २४ लाख ४३,२५४ मतदार असून त्यापैकी १३ लाख १५०६१ पुरुष तर ११ लाख २७,९९५ महिला मतदार असून मागील वेळेपेक्षा यावेळी तीन लाख ९४,५२३ एवढे १८ ते ३५ वयोगटातील तरुण मतदार आहेत. ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
या जिल्ह्यातील शहराचे मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होत असून ठाणे लोकसभा मतदार संघातील माजिवडा-मानपाडा, मीरा-भाईंदर, नवी मुंबई येथिल स्थानिक मतदारांपेक्षा इतर राज्यातील मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. नवीन वस्ती आणि नवीन मतदारांच्या हाती या मतदार संघातील उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. परराज्यातून आलेल्या मतदारांना स्थानिक पक्षाबाबत फारशी आपुलकी नसल्याने त्यांचा कल हा राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्षाकडे असतो त्यामुळे या मतदार संघातील ऐरोली, बेलापूर, ठाणे आणि मीरा-भाईंदर या चार विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत तर माजिवडा-मानपाडा आणि कोपरी पाचपाखाडी या दोन मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाची सत्ता आहे.
या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार जाहिर झालेला नाही, त्यामुळे शिवसेनेचे राजन विचारे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. युतीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर प्रचारात रंगत येणार असली तरी या मतदार संघातील तरुण चार लाख मतदार आणि नवीन वसाहतीमधील नवीन मतदार यांच्या भूमिकेवरच ठाण्याचा ठाणेदार ठरणार आहे.