ठाणे : यश कदमच्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर सनराईज स्पोर्ट्स क्लब असोसिएशन संघाने युनायटेड क्रिकेट क्लबचा १४० धावांनी दणदणीत पराभव करत स्पोर्टींग क्लब कमिटी आयोजित ६५ व्या शामराव ठोसर स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले.
सेंट्रल मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवताना यशने चौकारांची उधळण करत संघाला त्रिशतकी धावा उभारून देण्यात मोलाचे योगदान दिले. यशने ९८ चेंडूत २२ चौकार आणि एक षटकार ठोकत १३७ धावांची खेळी केली. त्याला चांगली साथ देताना पियुष वेतमने ९ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने ७७ धावा केल्या. या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर सनराईज संघाने युनायटेड क्रिकेट क्लबसमोर विजयासाठी ३१४ धावांचे आव्हान दिले. अक्षय तळेकरने ७४ धावांत ४ विकेट्स तर ओजस पाटील, देवांश काटकर आणि विकास लुबानाने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या.
या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना युनायटेड स्पोर्ट्स क्लबला केवळ १७४ धावांपर्यंत मजल मारता आली, यात संदीप पालवचा ६१ धावांचा आणि गोलंदाजीप्रमाणे फलंदाजीतहि छाप पाडताना विकास लुबानाने ४२ धावांची खेळी केली. जय वरराइकरने ३५ धावांत ३,नेस्टर नोरोन्हाने ३३ धावांत ३ विकेट्स मिळवल्या.पूजन राऊतने दोन आणि संजय संसारे, सोहम पोकळे यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली.
संक्षिप्त धावफलक : सनराईज स्पोर्ट्स क्लब असोसिएशन : ४० षटकात सर्वबाद ३१४ ( यश कदम १३७, पियुष वेतम ७७, अक्षय तळेकर ८-७४ – ४) विरुद्ध युनायटेड क्रिकेट क्लब : ३७.२ षटकात सर्वबाद १७४ ( संदीप पालव ६१, विकास लुबाना ४२, जय वरराइकर ८-३५-३, नेस्टर नोरोन्हा ६ -३३-३)