सिटजेस (स्पेन) : मेरी अॅन गोम्सने दिमाखदार कामगिरी कायम ठेवताना सालोमे मेलियाचा पराभव केल्यामुळे ‘फिडे’ जागतिक महिला सांघिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत जॉर्जियाविरुद्ध उपांत्य फेरीचा पहिला डाव भारताला बरोबरीत सोडवण्यात यश आले.
जॉर्जियाच्या लेला जावाक्शिव्हिलीने भक्ती कुलकर्णीला पराभूत केल्यामुळे भारतीय संघ पिछाडीवर पडला. मात्र, उपांत्यपूर्व फेरीतील दोन्ही सामने जिंकणाऱ्या गोम्सने उपांत्य फेरीच्या पहिल्या डावातही दमदार खेळ केला. तिने मेलियाला ५५ चालींमध्ये शह देत भारताला २-२ अशी बरोबरी साधून दिली. तत्पूर्वी, भारताची अव्वल खेळाडू द्रोणावल्ली हरिका आणि जॉर्जियाच्या निना झाग्निद्झे यांच्यातील सामना केवळ १४ चालींमध्ये बरोबरीत सुटला. आर. वैशाली आणि निनो बात्सिएव्हिली यांच्यातील सामन्यातही बरोबरी झाली.
त्याआधी, भारताने उपांत्यपूर्व फेरीत कझाकस्तानवर १.५-०.५ अशी मात करत स्पर्धेत आगेकूच केली होती. या लढतीतील पहिल्या डावात २-२ अशी बरोबरी झाल्यानंतर भारताने दुसऱ्या डावात २.५-१.५ अशी सरशी साधली.