नवी दिल्ली : भारताच्या स्वप्निल कुसळेने बाकू (अझरबैजान) येथे सुरू असलेल्या ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. हे भारताचे या स्पर्धेतील दुसरे पदक होते. सुवर्णपदकाच्या लढतीत २६ वर्षीय स्वप्निलला युक्रेनच्या सेरहिय कुलिशकडून १०-१६ असा पराभव पत्करावा लागला. रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या कुशिलला स्वप्निलने चांगली झुंज दिली. मात्र मोक्याच्या क्षणी तो सर्वोत्तम खेळ करू शकला नाही आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या स्वप्निलचे हे ‘आयएसएसएस’ विश्वचषक स्पर्धेतील पहिले वैयक्तिक पदक ठरले.
पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारात स्वप्निलने दर्जेदार कामगिरी केली. पात्रता फेरीत दुसऱ्या स्थानासह त्याने अंतिम फेरीचा टप्पा गाठला. त्यानंतर गुरुवारी आठ नेमबाजांच्या मानांकन फेरीत तो पुन्हा दुसऱ्या स्थानी राहिला. कुलिशने ४११ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. तसेच स्वप्निल ४०९.१ गुणांसह दुसरे स्थान मिळवत सुवर्णपदकाच्या लढतीसाठी पात्र ठरला. फिनलंडच्या अलेक्सी लेप्पाने ४०७.८ गुणांसह तिसरे स्थान मिळवले. त्यामुळे त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
सुवर्णपदकाच्या लढतीत स्वप्निलचा झुंजार खेळ अपुरा पडला. कुलिशने अखेरच्या पाचपैकी चार फेऱ्यांमध्ये १०.५ किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवले. याउलट स्वप्निलला केवळ एकदा १०.५ गुणांचा टप्पा ओलांडता आला आणि दोन वेळा त्याला १० हूनही कमी गुण मिळवता आले. स्वप्निलच्या रौप्यकमाईमुळे भारताने या स्पर्धेच्या पदकतालिकेत संयुक्तरीत्या सातव्या स्थानावर झेप घेतली आहे.