नूतनीकरणाचे काम चार वर्ष रखडलेले
ठाणे: केंद्र सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयअंतर्गत येणारे ठाण्यातील कामगार रूग्णालयची भयावह अवस्था पहायला मिळत आहे. तब्बल १४ एकर जागेमध्ये पाच मजली उभारण्यात आलेल्या ठाण्यातील कामगार रूग्णालयाची अवस्था दयनीय झाली आहे.
प्रशासनाच्या उदासिनतेमुळे ५०० खाटांचे प्रशस्त रूग्णालय अवघ्या ८ ते १० रूग्णांवर उपचार केले जात असून सर्वच वॉर्ड बंद असल्यामुळे रूग्णांना मुलुंड परेल आणि सायन येथील कामगार रूग्णालयात दाखल करावे लागत असल्याची परिस्थिती आहे. प्रशासनाने हे रूग्णालय लवकरात लवकर पुन्हा सुरू करावे, अशी मागणी मनसेचे जनहित व विधी विभागचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी केली आहे.
सुमारे ४४ वर्षांपूर्वी ठाण्यातील कामगारांना उपचार मिळण्यासाठी वागळे इस्टेट येथे कामगार राज्य विमा योजना रूग्णालय (इएसआयसी) ची पाच मजली इमारत उभारण्यात आली. तसेच डॉक्टर व इतर कर्मचारी तात्काळ उपलब्ध व्हावे यासाठी २७ सदनिकांची चार मजली इमारत ही बांधण्यात आली मात्र रूग्णालय आणि या इमारतीं कधी कोसळतील याचा नेम नाही. सद्या या रूग्णालयाची बिकट अवस्था आहे. ५०० बेडच्या या रूग्णालयात केवळ १०० बेड राहिले असून अनेक विभागांना सरकारच्या अनास्थेमुळे टाळे लागले आहे. अत्यवस्थ असलेल्या रूग्णाला मुंबईला पाठविण्याशिवाय पर्याय उरत नाही. याशिवाय इएसआयसी हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असल्यामुळे त्यांचे कॅश रिझर्व्ह ५० हजार कोटी रूपयांच्या घरात आहे. तरीही गेली अनेक वर्ष केंद्र सरकार या रूग्णालयाची साधी दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान गेल्या चार वर्षांपासून या इमारतीची डागडुजी केली जात असल्याचे दाखले दिले जात असून ते कामही अत्यंत संथगतीने सुरू आहे. तर रूग्णालयाची आतील परिसर प्रचंड भयावह आहे. रूग्णालयात सोनोग्राफी, आयसीसीयू, लॅब अशांचे फलक दिसतात मात्र ते अनेक वर्षे बंद अवस्थेत आहेत. या रूग्णालयात केवळ बाह्य विभाग सुरू असून गंभीर रूग्णास नेण्यासाठी साधी रूग्णवाहिकाही येथे उपलब्ध नाही. ज्या रूग्णवाहिका होत्या त्या याच परिसरात भंगार अवस्थेत पहायला मिळत असल्याचे मनसेचे जनहित विधी विभागचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी सांगितले.
पालिकेचा वास्तव्याचा परवानाच नाही
गेल्या ४४ वर्षात ठाणे पालिकेने या रूग्णालयासाठी वास्तव्याचा दाखला (ओसी) दिलेला नसल्याची माहिती पुढे आली आहे. ओसी नसल्यामुळे साहजिकच या रूग्णालयातील अग्निशमन यंत्रणाच बंद आहे. शिवाय अनेक वर्ष या रूग्णालयाचे फायर ऑडिटही झालेले नसल्याची माहिती मनसेचे जनहित व विधी विभागचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी उघडकीस आणली आहे.