मुंब्रा रेतीबंदर रस्त्याचे काम कासवगतीने; वाहनचालक हैराण

मंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही फटका

ठाणे: मुंब्रा रेतीबंदर येथील रस्त्याच्या कासवगतीने सुरू असलेल्या कामामुळे नागरिक त्रस्त झाले असून  गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना देखील याचा फटका बसत आहे.

रेतीबंदर येथील आत्माराम चौक ते बायपास या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले असते. चार कोटी  खर्चाची निविदा काढून या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सहा महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आले होते. त्याकरिता एका बाजूचा रस्ता खोदून ठेवण्यात आला होता. मागील चार ते पाच महिने तेथे कोणत्याही प्रकारचे काम हाती घेण्यात आले नव्हते. काही दिवसांपूर्वी बीएमडब्ल्यूचे काम सुरू करण्यात आले होते. हे काम अर्धवट असतानाच दुसऱ्याही बाजूचा रस्ता खोदण्यात आल्याने वाहनचालकांना गाडी चालवताना खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. दोन्ही बाजूंनी रस्ता खोदला आहे, पावसाळा तोंडावर आला आहे. पाऊस सुरू झाला तर दोन्ही रस्त्यांची दुर्दशा होणार आहे, या रस्त्यामुळे सध्या वाहतूक कोंडी होत आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा हा मतदार संघ आहे. कळव्याला जाताना आणि येताना त्यांना देखील खड्ड्याचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर महापालिका प्रशासनाचा अंकुश नाही. महापालिकेच्या  बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचे देखील दुर्लक्ष झाले आहे. पावसाळ्यापूर्वी हा रस्ता झाला नाही तर कळवा-मुंब्र्याला जाणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल, अशी भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी या रस्त्याचा पाहणी दौरा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.