दिव्यात एकाच वेळी ६४ रस्त्यांची कामे सुरू

ठाण्यात ७० टक्के रस्त्यांची कामे पूर्ण; पालिकेचा दावा

ठाणे : शासनाच्या माध्यमातून मिळालेल्या निधीमधून ठाणे शहरातील २८२ रस्त्यांची कामे यूटीडब्ल्यूटी, सिमेंट काँक्रिटीकरण, तसेच मास्टिक पध्दतीने सुरू असून एकट्या दिवा परिसरात त्यातील सर्वाधिक ६४ रस्त्यांच्या कामांना एकाच वेळी सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान शहरातील ७० टक्के रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याचा दावा पालिकेने केला आहे.

पालिका आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीत कार्यकारी अभियंतानिहाय आढावा घेण्यात आला. सध्या सुरू असलेल्या कामांची स्थिती, अपेक्षित काम पूर्ण होण्याची तारीख, काम पूर्णत्वाबाबत काही अडचणी असतील तर त्या कशा सोडविता येतील या बाबींची चर्चा करण्यात आली. यापूर्वी पूर्ण झालेल्या कामांची बिले सादर झाली आहेत का? गुणवत्तापूर्वक कामे केली असतील तर देयके प्रलंबित राहणार नाहीत याबाबत दक्ष रहा, अशा सूचना आयुक्त बांगर यांनी केल्या. रस्त्यांची कामे ही दर्जेदार पध्दतीने होतील यासाठी सर्व कार्यकारी अभियंत्यांनी या कामावर नजर ठेवा. शहरातील जे मुख्य रस्त्यांना प्रथम प्राधान्य देवून ही कामे तातडीने पूर्ण होतील या दृष्टीने नियोजन करावे, सर्व कार्यकारी अभियंत्यांनी सुरू असलेल्या कामांचा वेळोवेळी दर्जा तपासून संबंधित ठेकेदारास त्या प्रमाणे सूचना करुन गुणवत्तापूर्वक रस्ते तयार होतील यासाठी कटाक्ष ठेवावा, अशा सुचनाही आयुक्तांनी केल्या.

रस्त्यांची कामे करत असताना कलव्हर्ट, जॉईंट फिलींग, लेन मार्किंग, झेब्रा क्रॉसिंगची कामे देखील एकमार्गी पूर्ण करावीत. नव्याने तयार झालेल्या रस्त्यांची कामे जर खराब झाली तर ती खपवून घेतली जाणार नाही असा सूचक इशाराही या बैठकीत आयुक्त बांगर यांनी दिला.

रस्ते कामांमुळे नागरिकांना असुविधेचा सामना करावा लागत असल्याने सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत अशा सूचनाही या बैठकीत दिल्या. या बैठकीस नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, उपनगरअभियंता रामदास शिंदे, विकास ढोले तसेच सर्व कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

ठाणे शहरासाठी राज्य शासनाकडून 605 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. या अंतर्गत सध्या 282 रस्त्यांची कामे प्रभाग समितीनिहाय सुरू आहेत. ठाणे महापालिका हद्दीत 214 कोटी अंतर्गत 127 रस्त्यांची कामे सुरू आहेत तर 391 कोटीं अंतर्गत 155 रस्त्यांची कामे सुरू आहेत.

ठाणे शहरातील जागरूक नागरिक हे रस्त्यांच्या तक्रारी या सोशल मिडीयावर उदा. फेसबुक, द्विटरवरुन मांडत असतात. नागरिकांनी रस्त्यांच्या कामांबाबत तक्रार केली असल्यास त्याची तत्काळ दखल घेऊन त्यावर उपाययोजना करा. तसेच ज्या ठिकाणी कामे पूर्ण करताना अडथळा निर्माण होत असेल किंवा स्थानिक नागरिक हस्तक्षेप करत असतील तर संबंधित विभागाच्या लोकप्रतिनिधीशी संपर्क साधून कामे करा अथवा पोलीस बंदोबस्तात काम करुन घ्या, असे आयुक्तांनी नमूद केले.

प्रभाग समिती रस्त्यांची कामे

दिवा 64
कळवा 20
लोकमान्य-सावरकर 20
माजिवडा मानपाडा 49
मुंब्रा 26
नौपाडा कोपरी 30
उथळसर 25
वर्तकनगर 26
वागळे 22
एकूण 282