बोरीवली-विरार दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरू

भाईंदर: देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि लगतच्या उपनगरातील वाढती प्रवासी वाहतूक समस्या सोडवण्यासाठी रेल्वे, रस्ते आणि मेट्रोच्या पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष दिले जात आहे. मेट्रो मार्गांच्या विस्तारामुळे मुंबईची जीवनवाहिनी म्हटल्या जाणाऱ्या लोकल ट्रेन सेवेचे स्वरूप बदलण्याची तयारी सुरू आहे. पश्चिम रेल्वेने बोरीवली ते विरार या दरम्यान पाचव्या व सहाव्या रेल्वे मार्गाचे काम सुरू केले आहे.

शंभर वर्षांपूर्वी मुंबईत अवघ्या चार डब्यांपासून सुरू झालेला रेल्वेचा प्रवास आज एसी लोकलपर्यंत पोहोचला आहे. अधिक लोकल मार्गांची गरज लक्षात घेऊन मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रेल्वे रुळांमध्ये वाढ करण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते विरार या पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम सुरू झाले आहे. हार्बर लाईन गोरेगाव ते बोरिवलीपर्यंत वाढवण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेने गोरेगाव ते बोरिवली या सहाव्या मार्गिकेच्या उभारणीचे काम सुरू केले आहे. गोरेगाव ते खार दरम्यान सहाव्या मार्गाच्या जोडणीचे काम सुरू करण्यात आले आहे. लांब पल्ल्याच्या आणि लोकल गाड्या स्वतंत्र रुळांवर चालवण्याच्या उद्देशाने पश्चिम रेल्वेवर पाचवी आणि सहावी लाईनची गरज आहे.

मुंबई रेल्वे विकास काॅर्पोरेशनमार्फत बोरिवली ते विरारपर्यंत दोन अतिरिक्त 26 किमी. लांबीचे रेल्वे ट्रॅक टाकण्यात येणार आहेत. त्यासाठी संयुक्त मोजमाप सुरू केले आहे. एमआरव्हीसीचे मुख्य प्रवक्ते सुनील उदासी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकल्प एमयूटीपी ३ ए अंतर्गत सुरू करण्यात आला आहे. भूसंपादनाचे कामही सुरू झाले आहे.