ठाणे: खासदार राजन विचारे यांनी आज मेट्रो ४ मार्गाच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला तसेच या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची पाहणी त्यांनी केली.
आज खासदार राजन विचारे यांनी कापुरबावडी जंक्शन, तत्त्वज्ञान विद्यापीठ, मानपाडा उड्डाणपूल, पातलीपाडा जंक्शन, सुरज वाटर पार्क, कासारवडवली आणि भाईंदर पाडा अशा व इतर ठिकाणी होणारी वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली. कापूरबावडी येथे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन बंद केलेला कोलशेत रोड पुन्हा सुरू करण्याची मागणी वाहतूक शाखेकडे व नगर अभियंता यांच्याकडे केली आहे. ज्या ठिकाणी मेट्रोने खड्डे पाडलेले आहेत त्या ठिकाणी बॅरिगेट लावून ती जागा बंद करावी जेणेकरून अपघात टळू शकतील. प्रत्येक ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे तसेच ज्या ठिकाणी सेवा रस्ते विकास आराखड्यात आहेत ते पूर्ण करण्याच्या सूचना नगर अभियंत्यांना केल्या आहेत. खासदार राजन विचारे यांना अधिकाऱ्यांनी डिसेंबर २०२५ पर्यंत काम पूर्ण करून मेट्रो सुरू करू असे आश्वासन दिले आहे. मेट्रो मार्ग क्रमांक ४ वडाळा ते कासारवडवली मार्गाचे ६५.३२ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी अभियंता निलेश महाले, सुरेंद्र शेवाळे, भूषण मैसके, ठामपा नगर अभियंता सोनाग्रा तसेच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मंजुशा भोंगाळे, गोरख पाटील आणि ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे, ओवळा-माजिवडा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
घाटकोपर-कासारवडवली ठाणे मेट्रो ४ चे काम सुरू झाल्यानंतर त्याचे पिलर हायवेवर येत असल्याने हायवेवरील सर्व वाहतूक सेवा रस्त्यावर फिरवली असल्याने हाजुरी, लुईसवाडी या परिसरातील नागरिकांना नितीन कंपनी सिग्नलवर जाण्याकरिता हायवे पूर्व द्रुतगती महामार्गाचा वापर करावा लागत आहे. त्याचा त्रास तेथील राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना होत आहे. ज्ञानसाधना कॉलेज येथे केलेल्या भुयारी मार्गाच्या धरतीवर लुईसवाडी ते धर्मवीर मार्ग पाचपाखाडी येथे नवीन भुयारी मार्गाची निर्मिती करण्याची मागणी खासदार राजन विचारे यांनी एमएमआरडीए आयुक्तांकडे केली आहे.