रँगिओरा (न्यूझीलंड) : भारतीय महिला संघ आता आत्मविश्वास उंचावून एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. सलामीवीर स्मृती मानधनाने ६७ चेंडूंत साकारलेली ६६ धावांची खेळी आणि शिस्तबद्ध गोलंदाजीच्या बळावर भारताने अखेरच्या सराव सामन्यात वेस्ट इंडिजवर ८१ धावांनी विजय मिळवला.
रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात स्मृतीच्या डोक्यावर चेंडू आदळला होता. त्यामुळे तिला रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. मंगळवारी भारताने ५० षटकांत २५८ धावांचे आव्हान उभे केले. यात स्मृतीचे महत्त्वाचे योगदान होते. त्यानंतर भारतीय गोलंदाजांना ९ बाद १७७ धावसंख्येवर रोखले. येत्या रविवारी भारत-पाकिस्तान लढतीने महिला विश्वचषक अभियानाला प्रारंभ होत आहे.
भारताच्या हरमनप्रीत कौरने ‘आयसीसीसी’च्या महिला क्रिकेट क्रमवारीत एका स्थानाने आगेकूच करताना २०वे स्थान गाठले आहे. कर्णधार मिताली राजने आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात हरमनप्रीतने ६६ चेंडूंत ६३ धावा काढल्या होत्या. त्याशिवाय सराव लढतीत शतक साकारून तिने इशारा दिला आहे. सलामीवीर स्मृती मानधनानेही आठवे स्थान कायम राखले आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने गोलंदाजांच्या यादीत चौथा क्रमांक टिकवला आहे. पहिल्या १० क्रमांकांमधील झुलन ही एकमेव भारतीय खेळाडू आहे.