महिला पोलिसांचा खाक्या; चोराच्या आवळल्या मुसक्या तीन चोरीच्या गुन्ह्यांची उकल

ठाणे : अट्टल मोटारसायकल चोराचा माग शोधून काढत त्यास गजाआड करण्याची कामगिरी ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकातील महिला पोलिसांनी बजावली आहे. त्याच्या ताब्यातून तीन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या असून तीन चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

तक्रारदार यांनी दिलेली माहिती आणि घटनास्थळी असलेले सीसीटीव्ही फुटेज या आधारावर महिला पोलिसांनी चोरट्यास शोधून काढले आणि त्याला 31 मार्च रोजी मुंब्रा भागातून ताब्यात घेतले. या चोरट्याकडे अधिक केलेल्या चौकशीत त्याने मोटारसायकल चोरीची कबुली दिली. रिजवान शेख (28, कौसा, मुंब्रा) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून चोरीच्या तीन मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. या चोराने मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील मोटारसायकल चोरी केल्याचे पोलीस तपासातून उघड झाले आहे.

राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रूस्तमजी बिल्डिंग परिसरातून 21 मार्च रोजी एका फूड डिलिव्हरी बॉयची मोटारसायकल चोरीस गेली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास राबोडी पोलीस आणि खंडणीविरोधी पथक करीत होते. ठाणे खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस हवालदार शीतल पावसकर, पोलीस शिपाई मयुरी भोसले यांच्याकडे सोपवला. महिला पोलिसांनी या गुन्ह्याचा बाईकाईने तपास सुरू केला.