मुंबई : करोना विषाणूच्या वाढत्या रुग्णसंख्यमुळे ६८वी महिला राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर नवीन तारखा जाहीर केल्या जातील, असे सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या यजमानपदाखाली परभणी जिल्हा कबड्डी संघटना आणि परभणी महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ते १८ जानेवारी महिला गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा होणार होती. दोन दिवसांपूर्वीच क्रीडांगणांच्या तयारीला जोरदार प्रारंभ झाला होता. या स्पर्धेकरिता देशातील जवळपास ३० राज्यांचे संघ सहभागी होणार होते. पण सध्या देशात करोनाचे रुग्ण वाढीस लागले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने कोरोनाचे नियम अधिक कठोर केले असून, याची दखल घेत व खेळाडूंच्या सुरक्षेचा गंभीर विचार करून राज्य संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्याशी, सरचिटणीस आस्वाद पाटील व संयोजन समितीचे प्रमुख आमदार सुरेश वरपूडकर यांनी संपर्क करून स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
कोरोना परिस्थितीचा अंदाज घेऊन परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर लवकरच स्पर्धेच्या नवीन तारखा जाहीर करण्यात येतील, असे राज्य कबड्डी संघटनेचे सरचिटणीस आस्वाद पाटील यांनी म्हटले आहे. भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या प्रशासकांनी स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याचे म्हटले आहे.