डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे कल्याणात महिलेचा मृत्यू

कुटुंबियांचा आरोप

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या कल्याण पूर्वेतील शक्तीधाम रुग्णालयात कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आलेल्या एका ३० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पालिकेच्या आरोग्य विभागातील हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शांती देवी मौर्या (३०) असे मयत महिलेचे नाव आहे.

या घटनेप्रकरणी मयत महिलेचे पती अखिलेश मौर्या यांनी सांगितले की माझी पत्नी शांती देवी हिला मुतखड्याचा त्रास असल्याने तिच्या पोटात सारखे दुखत होते. त्यातच पालिकेच्या आरोग्य विभागातील आशा सेविका आमच्या परिसरात सर्वेसाठी आल्या असता त्यांना माझ्या पत्नीने पोटात दुखत असल्याचे सांगितल्याने त्यांनी मूतखड्याच्या आजारावर उपचारासाठी दाखल केले असता शांती देवी गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. पहिली तीन मुले असताना गर्भपात करून कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करण्याचे ठरले होते. तिचे सोमवारी ऑपरेशन करण्यासाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेले तिची प्रकृती खालावली. खालावल्याने तिला दुसऱ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी सांगण्यात आले. नजीकच्या खाजगी रुग्णालयात रुग्णवाहिकेमधून दाखल करण्यासाठी नेत असताना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला. हा मृत्यू पालिकेच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचाआरोप मयत महिलेचा पती अखिलेश व त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

स्थानिक आमदार सुलभा गायकवाड यांनी देखील महिलेच्या मृत्यूचा जाब डॉक्टरांना विचारत जे जे रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी मृतदेह पाठवावा, असे ठणकावले.

शिवसेना शहर प्रमुख निलेश शिंदे, यांनी सांगितले कि, या महिलेच्या मृत्यूस जे जे डॉक्टर जबाबदार असतील त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. याबाबत महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरू असून याबाबतचा अहवाल आल्यानंतर जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच आशा वर्कर यांना कुटुंब नियोजन शस्रक्रिया करण्यासाठी शासनाकडून टार्गेट देण्यात येते, त्या दृष्टीने देखील तपास केला जाईल असे त्यांनी सांगितले.

तर शक्तीधाम प्रसूतीगृहात महिलेच्या मृत्यूनंतर मृत महिलेचा जे जे रुग्णालयातून पोस्टमार्टम करून आणण्यात आले मात्र मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबाने नकार दिला होता. रुग्णालयाबाहेर महिलेच्या घरच्यांनी हॉस्पिटलच्या बाहेर बसून ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते. जोपर्यंत संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल केले जात नाही, तोपर्यंत मृतदेहाचा अंतिम संस्कार न करण्याचा निर्णय कुटुंबाने घेतला आहे.