ठाणे : कळव्यातील विटावा परिसरात प्लास्टर कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली आहे. ही इमारत २३ वर्षे जुनी असली तरी सध्या येथे सुरू असलेली बांधकामे झटपट आणि निकृष्ट दर्जाची होत असून भविष्यात अशा दुर्घटना मोठ्या प्रमाणात घडू शकतात असे बोलले जात आहे.
विटावा येथील सूर्यानगर भागात असलेल्या भवानी चौकात साईनगर चाळ असून चाळीची एक मजली इमारत आहे. या चाळीतील नवनाथ गोळे यांच्या घरात लीलावती कुंजू या भाड्याने राहतात. त्यांच्या घराच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळले. यामध्ये चंद्रिका जनार्दन (३३) यांचा मृत्यू झाला. तर लीलावती (६५) यांच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, बिट निरीक्षक व कळवा प्रभाग समितीचे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी जखमींना रुग्णलयात दाखल केले.
दुसऱ्या घटनेत राबोडीतील जुम्मा मशिदजवळ तीन मजली शेरदिल अपार्टमेंट या इमारतीच्या तळ मजल्यावरील सोहेल कुरेशी यांच्या रूमच्या स्लॅबचेही प्लास्टर गुरुवारी दुपारी कोसळले. या खोलीत इस्राईल खान नावाचा इसम भाड्याने राहत असून या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. ही इमारत २० वर्षे जुनी असून या घटनेनंतर बचावपथकाने दुर्घटनेनंतर घटनास्थळी धाव घेत प्लास्टर हटवले. मात्र इमारत धोकादायक झाल्याने या इमारतीमधील आठपेक्षा अधिक रहिवाशांना इमारतीमधून बाहेर काढून सुरक्षितस्थळी त्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या दोन्ही घटनांमुळे शहरातील धोकादायक व जीर्ण झालेल्या इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याआधीही पाच महिन्यांपूर्वी कळव्यातील खारेगावात दुमजली ३५ ते ४० वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब आणि टेरेसचा काही भाग कोसळला होता. यावेळी या इमारतीतील १२ कुटुंबांना सुखरूप बाहेर काढण्यात आले होते. त्यामुळे अशा जीर्ण इमारती वेळीच खाली न केल्यास भविष्यात जीवितहानी होण्याची भीती व्यक्त होत आहे.
बांधकामे झटपट; सहायक आयुक्तांचे तोंडावर बोट
विटाव्यात आजही बेकायदेशीरपणे खाडीत भराव टाकून चाळींचे बांधकाम सुरू आहे. काही इमारतींच्या बांधकामांवर दाखवण्यापुरती कारवाई करण्यात आली. आता त्यावर राजरोस बांधकाम होत आहे. त्यामुळे ही बांधकामे धोकादायक झाली आहेत. अनेक तक्रारीनंतरही सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर यांनी कारवाईबाबत गांभीर्य दाखवलेले नाही. त्यामुळे होणाऱ्या जीवितहानीस अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरण्याची मागणी नागरिक करत आहेत.