स्वारगेट बसस्थानकात बसमध्ये महिलेवर अत्याचार; राज्यात खळबळ

* २३ सुरक्षारक्षक निलंबित
* परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली तत्काळ दखल

पुणे : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात एका 26 वर्षांच्या तरुणीवर अत्याचाराची घटना घडली आहे. नराधमाने चक्क बसमध्ये हा अत्याचार केला आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी या घटनेची तत्काळ दखल घेत आदेश दिल्यानंतर डेपोतील २३ सुरक्षारक्षकांना निलंबित करण्यात आले.

मंगळवारी पहाटे 5.30 वाजता ही घटना घडली. दत्तात्रय गाडे असे या अत्याचार करणाऱ्या नराधमाचे नाव आहे. पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. अत्याचार केल्यानंतर आरोपीने तरुणीला जीवे मारण्याचीही धमकी दिली. या घटनेची कोणाकडे वाच्यता केली तर जीवे मारीन असे हा आरोपी पीडित तरुणीला म्हणाला होता. त्यानंतर घडलेला हा सर्व प्रकार पीडित तरुणीने मित्राला सांगितल्यानंतर हा सर्व प्रकार उजेडात आला.

या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित बसस्थानकावरील कार्यरत असलेले स्थानकप्रमुख (सहाय्यक वाहतूक अधिक्षक) व आगार व्यवस्थापक यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत विभागीय चौकशी करून दोष आढळल्यास त्यांना तत्काळ निलंबित करावे, असे निर्देश उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (प्रभारी ) श्री. विवेक भीमनराव यांना दिले आहेत. तसेच एकूणच महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात आढावा घेण्यासाठी उद्या एसटीच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तत्काळ बैठक बोलाविण्याचे निर्देश देखील मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत.

श्री. सरनाईक यांनी गंभीर दखल घेतली असून संबंधित बसस्थानकावरील त्यावेळी कर्तव्य असलेल्या स्थानक प्रमुख तसेच त्या आगाराचे प्रमुख यांची या प्रकरणी प्रवाशांच्या सुरक्षा संदर्भात हलगर्जीपणा दाखविल्याबद्दल विभागनिहाय चौकशी करावी, त्या चौकशीमध्ये ते दोष आढळल्यास त्यांना तत्काळ निलंबित करावे असे निर्देश दिले आहेत. तसेच या बसस्थांनकावर कार्यरत असलेले सर्व सुरक्षा रक्षक यांना तत्काळ बदलण्यात यावे, तसेच त्यांच्या ऐवजी दुसऱ्या सुरक्षा रक्षकांना नेमण्याची मागणी संबंधित सुरक्षा मंडळाला करावी, असे निर्देश दिले आहेत. याबरोबरच या प्रकरणाचा सविस्तर अहवाल पुढील सात दिवसात सादर करावा अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी श्री. भिमनवार यांना दिल्या आहेत.