डब्ल्यूएनएस अ आणि मफतलाल अंतिम फेरीत; अथर्व डाकवे याची अष्टपैलू कामगिरी

ठाणे: ठाणेवैभव वासंतिक क्रिकेट करंडक स्पर्धेच्या ब गटातील उपांत्य फेरीच्या सामन्यात डब्ल्युएनएस ग्लोबल सर्व्हिसेस अ संघाने मुंबई पोलीस ब संघाला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला. डब्ल्युएनएसच्या अथर्व डाकवे याने अष्टपैलू कामगिरी केली. तर दुसऱ्या सत्रात झालेल्या सामन्यात मफतलाल क्रिकेट क्लबने मुंबई पोलीस अ संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

डब्ल्युएनएस संघाने नाणेफेक जिंकून मुंबई पोलीस ब संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. मुंबई पोलिसांनी २० षटकांत १० गडी गमावून ११९ धावांचे आव्हान उभे केले. डब्ल्युएनएसच्या अथर्व डाकवे याने चार षटकांत १७ धावा देत तीन बळी घेतले. मुंबई पोलिसांच्या प्रज्ञेश लाड याने सहा चौकारांच्या साहाय्याने सर्वाधिक ४६ धावा केल्या. उर्वरित फलंदाजांना पिचवर तग धरता आला नाही.

डब्ल्युएनएस संघाच्या अथर्व डाकवे याने सर्वाधिक २५ धावा केल्या. त्या खालोखाल क्षितिज कानडे याने २३ धावा केल्या. डब्ल्युएनएस संघाने १८.५ षटकांत चार गडी राखून मुंबई पोलीस संघाचा पराभव केला.

दुसऱ्या सत्रात मुंबई पोलीस अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मफतलाल क्रिकेट क्लबने २० षटकांत आठ गडी गमावून २२४ धावा केल्या. पुनीत त्रिपाठी याने सात चौकार आणि नऊ षटकार ठोकत दमदार ९८ धावा केल्या तर सिद्धांत अभटराव याने सात चौकार आणि पाच षटकार ठोकत ७२ धावा केल्या. मुंबई पोलीस अ संघाच्या रोहित पोळ याने ३४ धावा देत तीन गडी बाद केले.

मुंबई पोलीस अ संघाच्या रोहित पोळ याने सर्वाधिक ७४ धावा केल्या तर श्रीकांत लिंबोळे याने ३९ धावा केल्या. या दोघांच्या जोरावर मुंबई पोलिसांना २० षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात २११ धावा उभ्या करता आल्या. रोहित पोळ याचा अष्टपैलू खेळ संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.