लोकसभा निवडणुकीचे वारे; बदल्यांचा मोसम जोरात सुरू;

ठाणे: केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची माहिती मागविण्यास सुरुवात केली असून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मोसम सुरु होणार आहे. ही आगामी लोकसभा निवडणुकीची चाहूल असल्याचे बोलले जात आहे.

निवडणूक आयोगाने मागील आठवड्यात सर्व राज्यातील निवडणूक आयोगाला पत्र पाठवून जिल्हाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, पोलिस विभागातील अधिकारी किती वर्ष त्या विभागात काम करत आहेत? त्यांच्या कामाचे स्वरूप कसे आहे? नागरिकांबरोबर त्यांचा थेट संपर्क होतो का? अशा प्रकारची माहिती मागविण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता फेब्रुवारी महिन्यात लागण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रशासनातील अधिकारी कामाला लागले आहेत. मतदार याद्यांचे काम सुरु आहे. मतदार केंद्र कुठे असावेत, किती असावेत याची देखिल चाचपणी केली जात आहे. त्यामुळे लवकरच लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत राज्य निवडणूक विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले कि लोकसभा निवडणुकीची तयारी सहा महिने अगोदर करावी लागते. मागील सार्वत्रिक निवडणूक एप्रिल महिन्यात झाली होती. मे महिन्यात लोकसभा अस्तित्वात आली होती, त्यामुळे यावर्षी देखिल फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

पुढील वर्षी मार्च, एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकीचा धुरळा उडेल असे देखिल त्यांनी सांगितले.
निवडणुकीची शक्यता लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांचा सपाटा सुरु केला आहे.