ठाण्याची घनकचरा समस्या गंभीर
ठाणे: गेल्या महिन्याभरापासून उद्भवलेल्या ठाणे शहरातील कचरा कोंडीचा प्रश्न अजूनही जैसे थे आहे. यावरून आता राजकारण सुरू झाले असून दुसरीकडे आपल्या मतदारसंघामध्ये कचरा संकलन केंद्र नको अशी स्पष्ट भूमिका लोकप्रतिनिधींनी घेतल्याने कचरा संकलन करण्यासाठी कुणी जागा देता का जागा असे म्हणण्याची पाळी ठाणे महापालिकेच्या प्रशासनावर आली आहे.
आजच्या घडीला वागळे येथील सी.पी. तलाव परिसरात कचर्याची एकही गाडी घुसू देणार नाही, अशी भूमिका स्थानिक नागरिकांसह शिवसेना शिंदे गटाने घेत विरोध दर्शवला आहे. ठाणे मतदारसंघातील बाटा कंपाऊंड परिसराला भाजपने विरोध केला आहे. तर गायमुख येथील आरक्षित भुखंड आणि दिवा येथील डायघर डंपिंगलाही स्थानिक आमदार आणि ग्रामस्थांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शहराची कचराकुंडी रिकामी करायची कुठे असा प्रश्न ठाणे पालिका प्रशासनासमोर आहे.
मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या मोहिमेंतर्गत ठाणे शहराचे मोठ्या प्रमाणात सौंदर्यीकरण करण्यात आले. रस्त्यांच्या भिंती चित्रांनी बोलू लागल्या. दुभाजक रंगले, झाडफुलांनी बहरले. शहरात सर्वंकष स्वच्छता मोहिम राबवून सर्व प्रभाग समित्या पाण्याने धुऊन काढण्यात आल्या. याचे पुढचे पाऊल म्हणून महापालिकेने शहरात शून्य कचरा मोहिम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या सर्व प्रयत्नांवर ‘कचरा’ फेरला गेला आहे.
आज शहरात जिथे नजर जाईल तिथे कचराच कचरा साचलेला दिसत आहे. रस्ते, गृहसंकुले, मोकळ्या जागा सर्वत्र कचर्याने व्यापून गेले आहेत. शहरातील अर्ध्या रस्त्यांवर कचर्याचे अतिक्रमण झाले आहे. कचरा आणि दुर्गंधीतून वाट काढताना ठाणेकरांना नाक मुठीत धरावे लागत आहे. यावरून आता राजकारण सुरु झाले असून पालिका मुख्यालयाबाहेर कचरा फेकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
ठाणे शहरात रोज जमा होणारा एक हजार मेट्रीक टन कचरा वागळे येथील सी.पी.तलाव संकलन केंद्रावर आणण्यात येतो. येथे कचर्याचे वर्गीकरण होऊन पुढील कचरा विल्हेवाट व पुर्नप्रक्रीया केंद्रावर जाणे अपेक्षित आहे. पण दिवा येथील डम्पिंग बंद पाडण्यात आले. आणि राज्य शासनाने भिवंडीत ३५ एकर भुखंड कचरा प्रकल्पासाठी देऊनही राजकीय विरोधामुळे तो सुरू होऊ शकला नाही. परिणामी सी.पी. तलाव परिसराचे रुपांतरण डंपिंग ग्राउंडमध्ये झाले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवेळीही हा प्रश्न ऐरणीवर आणण्यात आला. पण वेळ मारून नेण्यात राजकीय पुढार्यांना यश आले. मात्र आता सी. पी. तलाव कचरा प्रश्न कायमचा निकाली लावण्याचा निर्णय स्थानिक पुढार्यांनी घेतला आहे.
वास्तविक उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातच ही जटील समस्या निर्माण झाली असल्याने त्यांचे खंदे समर्थक असलेले स्थानिक माजी नगरसेवक राम रेपाळे, खासदार नरेश म्हस्के मैदानात उतरले आहेत. एकही घंटागाडी येथे येणार नाही आणि रिकामी होणार नाही असा सज्जड दमच त्यांनी ठाणे पालिका प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे हतबल होऊन पालिकेने आतकोली येथे कचरा पोहचवण्यास सुरुवात केली. पण तेथेही स्थानिक पुढार्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. वास्तविक शहरात जमा होणारा कचरा घंटा गाडीतून संकलन केंद्रावर त्याचे वर्गिकरण होणे आवश्यक आहे. त्यानंतर मोठ्या कॉम्पेक्टरमधून तो क्षेपणभूमी किंवा पुर्नप्रक्रिया केंद्रात पोहचवणे अपेक्षित आहे. पण आजच्या घडीला पालिकेला कचरा संकलनासाठी जागाच मिळत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. कोणत्याही राजकीय लोकप्रतिनिधींना मतदारांचा राग ओढावून घेण्याची इच्छा नसल्याने त्यांनी संकलन केंद्रांना विरोध दर्शवल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
शहरात जमा होणाऱ्या कचर्याचे एकाच ठिकाणी वर्गिकरण करण्याऐवजी त्याचे चार ठिकाणी वर्गीकरण केल्यास ही समस्या काही अंशी दूर होऊ शकते. त्यासाठी वागळे येथे सी. पी. तलाव, ठाणे शहरात टाटा कंपाऊंड, कोलशेत, घोडबंदर येथे गायमुख तर दिवा येथे डायघर ही चार ठिकाणे निवडण्यात आली होती.