विनातंटा कारशेड मार्गस्थ !

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोसाठी २५ हेक्टर जमीन हस्तांतरित

ठाणे : मेट्रो कारशेड उभारण्याच्या जागेवरून अनेक ठिकाणी वाद सुरू असताना ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो पाचसाठी मात्र कारशेड उभारण्याकरिता कशेळी पुलाजवळील भूखंड विनासायास आणि विनातक्रार मिळाला आहे.

वडाळा-कासारवडवली, घाटकोपर-वडाळा, कांजूरमार्ग-अंधेरी, या मेट्रो मार्गासाठी कारशेड उभारण्यास भूखंड मिळत नाही आणि मिळालाच तर त्यावरून वाद होत आहेत. कांजूरमार्ग आणि आरे येथील मेट्रो कारशेड उभारण्याच्या प्रश्नावरून भाजप-सेना यांच्यात वाद निर्माण झाला आहे. तो वाद न्यायालयात गेला आहे. वडाळा-कासारवडवली या मार्गावरील कारशेड ठाण्यातील भाईंदर पाडा येथे उभारण्यास स्थानिक शेतकरी विरोध करत आहेत. कारशेडचा प्रश्न मागील अनेक वर्षे प्रलंबित असताना ठाणे-भिवंडी-कल्याण या मार्गावरील मेट्रोकरिता मात्र कशेळी पुलाच्या जवळ असलेला भूखंड विनासायास, विना तंटा मिळाला आहे. येथील सुमारे २५ हेक्टर जमिनीचे हस्तांतर मेट्रो पाच कारशेडकरिता करण्यात आले आहे. मेट्रो पाचचे काम तीन वर्षात पूर्ण होणार आहे. या मेट्रोकरिता कारशेडची आवश्यकता असून लवकरच त्याचे देखिल काम सुरू होणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईतील कारशेडचा प्रश्न मुंबईमध्ये सुटत नाही, ठाणेकरांनी मात्र सहकार्य केले, याबद्दल एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी आभार मानले आहेत.