भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांचा सवाल; देशद्रोही मलिकच्या राजीनाम्यासाठी ठाण्यात भाजप आक्रमक
ठाणे : बॉम्बहल्ले करून शेकडो मुंबईकरांचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याचा हस्तक असलेल्या नवाब मलिक यांना सत्तेच्या लाचारीसाठी मंत्रीपदावर ठेवणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावापुढे न झुकता मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ठाकरी बाणा दाखविला जाणार आहे का, असा सवाल भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी केला.
एनआयएच्या ऑपरेशनमध्ये ९ ठिकाणी छापे टाकल्यावर मिळालेल्या लिंकनुसार रियल इस्टेटचे व्यवहार मनी लॉंड्रींगच्या माध्यमातून होत असल्याचे लक्षात आले. त्यातील एक प्रकरण मंत्री नवाब मलिक यांचेच निघाले. दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप हा देशद्रोह एवढाच गंभीर असल्याने असा ठपका असलेला मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळात असणे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे, असे आ. डावखरे म्हणाले. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ठाणे शहर भाजपाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात भाजपाच्या उपाध्यक्षा माधवी नाईक, सचिव संदिप लेले, ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर, संजय वाघुले, मुकेश मोकाशी, भरत चव्हाण, महिला मोर्चाच्या अध्यक्षा मृणाल पेंडसे, नगरसेविका नम्रता कोळी, दिपा गावंड, परिवहन समितीचे सदस्य विकास पाटील, जयेंद्र कोळी, राजेश मढवी, सिताराम राणे, सागर भदे आदींसह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना निवेदन देण्यात आले.
मुंबई महापालिकेसह अन्य निवडणुकांवर डोळा ठेवून मुस्लिमांच्या अनुनयाकरिता देशद्रोही दाऊदच्या हस्तकास अभय देण्याचे हीन राजकारण ठाकरे सरकारच्या अधोगतीस कारणीभूत ठरेल, असा इशाराही आमदार डावखरे यांनी दिला. नवाब मलिक यांनी दाऊदच्या दहशतवादी कारवायांकरिता पैसा जमा करण्याच्या कटास सहाय्य केल्याचा आरोप असून त्यासाठीचे सज्जड पुरावे ‘ईडी’कडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्या दाऊद इब्राहीमने १९९२ मध्ये मुंबईत भीषण बॉम्बस्फोट घडवून शेकडो निरपराध नागरिकांचे बळी घेत देशाविरुद्धचा सर्वात घातक दहशतवादी कट आखला, त्याच दाऊदशी नवाब मलिक यांची हातमिळवणी असल्याचा गंभीर आरोप ईडीकडून करण्यात येत आहे. मात्र, मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यास विरोध करण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या राजकारणाची मोठी किंमत महाराष्ट्राला मोजावी लागेल. अशा देशद्रोही कारवायांना मदत केल्याचे पुरेसे पुरावे ईडीकडे असल्याचे सांगण्यात येत असतानाही मलिक यांना मंत्रिपदावर ठेवण्याच्या दबावापुढे झुकून मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपण कणाहीन राजकारणी असल्याचे सिद्ध केले आहे, अशी टीकाही श्री. डावखरे यांनी केली.
१९९२-९३ च्या बॉम्बस्फोटानंतर दाऊदच्या हल्ल्यापासून मुंबईकरांचे संरक्षण करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचे वारस आज मात्र, मुख्यमंत्रीपद आणि सत्तेच्या हव्यासापोटी दहशतवादी दाऊदच्या हस्तकास वाचविण्याचा घातक खेळ करत आहेत, असा आरोप करून ठाकरे यांच्या कणाहीन राजकारणामुळे महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेस धोका निर्माण होईल, असा इशाराही आमदार डावखरे यांनी दिला. बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी हिंमत असेल तर आता मलिक यांची हकालपट्टी करावी, असे ते म्हणाले. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भर विधिमंडळात भ्रष्ट पोलीस आधिकारी सचिन वाझे याची पाठराखण केली होती. त्यानंतर खंडणीखोर अनिल देशमुख यांनाही पाठीशी घालण्याचे आटोकाट प्रयत्न केले. केवळ सत्ता टिकविण्यासाठी भ्रष्ट, व्यभिचारी आणि लाचखोर, खंडणीखोर सहकाऱ्यांना वाचविताना ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या ठाकरी बाण्यास मूठमाती दिली. आता मतांच्या राजकारणासाठी देशद्रोही कारवायांतील सहभागाचा आरोप असलेल्या नवाब मलिक या मंत्र्याकरिता आपला कणा झिजविण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर आली आहे. स्वतःची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सांभाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे अनुयायी असलेल्या कडवट शिवसैनिकांच्या भावनांची थट्टा चालविली आहे, असा आरोप आमदार डावखरे यांनी केला. नवाब मलिक या मंत्र्याने दाऊदच्या कारवायांसाठी बेनामी पद्धतीने मालमत्ता हडप करून गरीब कुटुंबांची फसवणूक केली असून हा पैसा दाऊदकडे वळविल्याचा आरोप आहे. दाऊदच्या दहशतवादी कारवायांना आर्थिक सहाय्य करण्याच्या अशा गुन्हेगारी व देशद्रोही कारवायांना सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने संरक्षण द्यावे, हा महाराष्ट्राच्या कोट्यवधी नागरिकांच्या सुरक्षिततेशी सामूहिक खेळ आहे. अशा खेळात सहभागी होऊन राज्याच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या जनताविरोधी सरकारच्या निषेधार्थ भाजप संपूर्ण शक्तिनिशी लढा देईल, असा इशाराही श्री. डावखरे यांनी दिला.
`नवाब दे जबाब, किती खाल्ले कबाब’!
मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर झालेल्या आंदोलनाच्या वेळी निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. त्यातील `नवाब दे जबाब, मनी लॉंड्रिंगमध्ये किती खाल्ले कबाब’ ही घोषणा लक्षवेधी ठरली. देशाविरोधात कारस्थान करणाऱ्यांबरोबर मलिकांचे आर्थिक संबंध सिद्ध झाले आहेत. शिवसेनेने हिंदुत्वाची साथ सोडली, पण आता देशविरोधी व्यक्तींबरोबर हातमिळवणी करून सत्ता चालविली जात आहे. त्याला जनता माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया आमदार डावखरे यांनी दिली. ईडीच्या कारवाईने नवाब मलिकांचा नकाब उतरला आहे. मलिकांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, अशी प्रतिक्रिया आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली.