महाराष्ट्राला वेगाने पुढे घेऊन जाणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची संपूर्ण जबाबदारी खांद्यावर घेत, विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाचे श्रेय आपल्या सर्व सहकाऱ्यांना देण्यासाठी हिमालयाएवढे मोठे मन लागते. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कड्या-कपाऱ्यात हिमालयाएवढे उत्तुंग नेतृत्व असलेले देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे मीडिया सेल प्रसिध्दी प्रमुख नवनाथ बन यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांची घेतलेली मुलाखत.

आझाद मैदानावर झालेल्या शपथविधी सोहळ्याप्रसंगी लोटलेल्या अथांग जनसागराकडे पाहून तुम्हाला कसे वाटले?
एवढ्या मोठ्या जनसागराकडे पाहत असताना मला नक्कीच आनंद झाला पण, त्यासोबत माझ्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीव देखील झाली. जे यश या निवडणुकीत जनतेने मिळवून दिले आहे, ते फक्त साजरे करण्यासाठी नसून त्यातून प्रेरणा घेऊन जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आहे. मला असे वाटते की भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला शपथविधी सोहळा पाहत असताना आनंद झाला आहे.

शपथविधी दरम्यान महाराष्ट्र आता थांबणार नाही अशी टॅगलाईन झळकत होती, तर महाराष्ट्र आता कुठल्या दिशेने पुढे जाणार आहे ?
– अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाले, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तर मी आणि अजितदादा पवार उपमुख्यमंत्री झालो. आम्ही तिघांनी एकत्रितरित्या अतिशय वेगाने महाराष्ट्राला ट्रॅकवर आणले. जे प्रकल्प मी मुख्यमंत्री असताना सुरु होते त्यांना गती मिळाली तर काहींचे लोकार्पण झाले. अनेक नवीन योजना सुरु केल्या. या सर्व गोष्टी आता वेगाने पुढे नेताना महाराष्ट्र आता थांबणार नाही. आता येणाऱ्या  काळातही अनेक नवीन योजना, प्रकल्प सुरु करायचे आहेत परंतु माझा भर हा नदीजोड प्रकल्पांवर असणार आहे. सध्या मी चार नदीजोड प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. हे प्रकल्प महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळातून मुक्त करतील. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे ग्रीन एनर्जीवर माझा भर राहणार आहे. मागच्या काळात आपण ५४ हजार मेगावॅटचे प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात २०३० साली ५२ टक्के वीज ही ग्रीन एनर्जीमुळे मिळणार आहे. यामुळे प्रामुख्याने उद्योगक्षेत्र व कृषिक्षेत्राला जास्त फायदा होणार असून यामुळे महाराष्ट्रात रोजगाराची निर्मिती देखील होईल व महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला विशेष चालना मिळेल.

खासकरून मुंबईचा विचार केला तर २०१४ ते २०१९ आणि मागील अडीच वर्षांत मुंबईचा चेहरामोहरा बदलला आहे. इन्फ्रामॅन म्हणून तुमची ओळख झाली. तर नव्याने मुंबईसाठी व एमएमआर क्षेत्रासाठी नेमक्या काय योजना आहेत. मुंबईकरांच्या आयुष्यात पुढील पाच वर्षांत कसा कायापालट होणार आहे?
– २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या कोणत्याही एमएमआर क्षेत्रातून दुसऱ्या एमएमआर क्षेत्रामध्ये जायला एक तासाहून कमी अवधी लागेल अशी घोषणा मी केली होती. सध्या आम्ही त्याच्यावर वेगाने काम करत आहोत. आपण बघितलं तर कोस्टल रोड झाला, वरळी-वांद्रे सी लिंक झाला, त्याच्या पुढील वांद्रे-वर्सोवा सी लिंकचे काम सुरु आहे. वर्सोवा-मढचे टेंडर दिले असून त्याचेही काम आता सुरु होईल. मढपासून विरारपर्यंतच्या सी लिंकचे कामही आम्हाला सुरु करायचे असून यासाठी जपानच्या सरकारने चाळीस हजार कोटी रुपये देण्याचे कबुल केले आहे. यामुळे मुंबईमधील ट्रॅफिक, वाहतूक समस्या कमी होण्यास नक्कीच मदत होईल. पश्चिम द्रुतगती मार्गावर या रिंगरोडमुळे होणारे ट्रॅफिक कमी होणार असून विरारपर्यंत हा रस्ता गेल्यामुळे विरार-अलिबाग कॉरिडॉरचे काम आधीच सुरू केल्यामुळे हे फायद्याचे आहे. अटल सेतुमुळे मुंबई आणि नवी मुंबईतील अंतर कमी झाले आहे. याचसोबत ३७५ किलोमीटरचे मेट्रो नेटवर्क तयार करण्याचे कामही आम्ही सुरु केले आहे. याचा फायदा मुंबईकरांना नक्कीच होणार आहे. मुंबईकरांचे रोजचे ३ ते ४ तास प्रवासात जातात, तो वेळ वाचेल व फावला वेळ त्यांना आपल्या कुटूंबासाठी देता येईल. रस्त्याचे जाळे, उड्डाणपूल यामुळे प्रवास अधिक जलद करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबई आणि एमएमआर क्षेत्रामध्ये रहिवास ही मोठी समस्या आहे. त्यावर उपाय म्हणून व मराठी माणसाला मुंबईतच घर मिळावे यासाठी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सेल्फ री- डेव्हलपमेंटला प्राधान्य देण्यासाठी काही प्रमुख मागण्यांना मंजुरी दिली.

विरोधक सातत्याने धारावीच्या प्रकल्पाबद्दल आक्षेप घेत आहेत. यावर तुमचे काय मत आहे?
– पहिले तर धारावी प्रकल्पाची संकल्पना राजीव गांधींच्या काळात मांडली गेली होती. त्यानंतर कोणत्याच सरकारने त्यावर काम केले नव्हते. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या प्रकल्पाचा डीपीआर तयार केला. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोकळी जागा लागणार होती व ती जागा आम्ही रेल्वेकडून विकत घेतली. त्यासाठी विकासक नेमून टेंडरही भरले. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर त्यांनी ते टेंडर रद्द केले. नव्या अटी व नियम लागू करण्यात आले. आताच्या नव्याने झालेल्या टेंडर्समधील १०० टक्के नियम व अटी उद्धव ठाकरेंच्या सरकारने तयार केलेल्या आहेत. यात एक बदल करून टीडीआरचे कॅपिंग करा हे सांगितले. त्याचा डिजीटल प्लॅटफॉर्म असेल. नियमात बसणाऱ्यांना धारावीतच घर देणार असून जे नियमात बसत नाहीत, त्यांच्यासाठी रेंटल हाऊसिंग करायचे ठरले आहे.

विरोधकांनी ईव्हीएम मशीनवर शंका घेऊन निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली आहे. यावर तुमचे काय म्हणणे आहे?
– तेवढ्यापुरते न बोलता मला असे वाटते विरोधकांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. एकाच दिवशी झारखंड व महाराष्ट्रात निवडणूक होते. झारखंडमध्ये ते जिंकतात तेव्हा ईव्हीएम मशीन मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. महाराष्ट्रात ते हरतात तेव्हा ईव्हीएममध्ये प्रॉब्लेम आहे. महाराष्ट्रात एकाच दिवशी लातूर जिल्ह्यात लातूर शहरात अमित देशमुख जिंकतात व लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख हरतात. ईव्हीएमला दोष देण्याऐवजी राहुल गांधींनी जर आत्मचिंतन केले तर त्यांना नक्कीच चांगल्या जागा निवडून आणता येतील.

गेल्या पाच वर्षात तुमच्यावर अनेकांनी वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका केली. आता तुम्ही पुन्हा सरकारमध्ये आला आहात तर या सर्वांना काय उत्तर द्याल?
– पहिल्यांदा तर मी त्यांचे आभार मानतो. कारण त्यांनी जे मला सातत्याने टार्गेट केले त्यामुळे लोकांच्या मनात माझ्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली. लोकांना असं वाटलं की माझ्याशी चुकीचं वागलं जात आहे. कारण हे इतर पक्ष व त्यांचे ट्रोलर माशी शिंकली तरी मला दोषी ठरवायचे. अतिशय असभ्य भाषेत बोलायचे. त्यामुळे साहजिकच मला लोकांची सहानुभूती मिळाली. दुसरं म्हणजे यामुळे मला लढण्याची ताकद मिळाली. लढून त्यांना त्यांची जागा दाखवायची आहे असा विश्वास तयार झाला. त्यांच्या या वागण्याचा मानसिक त्रास नक्कीच झाला, परंतु माझे कोणतेही नुकसान झाले नाही.

महायुतीमधील तीन पक्षांना एकत्र घेऊन पुढे जातानाची कसरत कशी असणार आहे? गेल्या अडीच वर्षात आम्ही दाखवून दिले आहे की तीन पक्ष एकत्रितरित्या व वेगाने काम करू शकतात. आमच्यात चांगला समन्वय आहे. आम्ही ते करून दाखवू.
भविष्यात राज ठाकरे व महायुती असे कॉम्बिनेशन होऊ शकते का?
-लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी आम्हाला दिलेल्या पाठिंब्याचा  फायदा नक्कीच झाला. महायुतीत आम्ही मुळात तीन पक्ष होतो, त्यामुळे विधानसभेत देण्यासाठी आमच्याकडे जागा नव्हत्या. इतक्या मोठ्या प्रवाहाच्या विरोधात ते लढले तरी त्यांना चांगली मते मिळाली आहेत. मला असं वाटतं की त्यांचे व आमचे विचार मोठ्या प्रमाणात सारखे आहेत. त्यामुळे त्यांना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य होईल तिथे आम्ही सोबत येऊ.

महापालिका, नगर परिषदेच्या रखडलेल्या निवडणुका आता येत्या काही दिवसात पूर्ण होतील?
निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न असेल.