रुग्णांचे नातेवाईक मदतीपासून राहणार वंचित?

आयसीएमआरमध्ये कोरोना मृतांची नोंदच नाही

ठाणे : कोरोना काळात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या वारसांना शासनाची आर्थिक मदत मिळावी यासाठी ठाण्यातील शेकडो नागरिकांनी ऑनलाईन अर्ज केले. मात्र हा अर्ज करताना ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांची आयसीएमआरमध्ये नोंदच नसल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. परिणामी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शेकडो वारसांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागणार असून सोमवारी अनेक नागरिक पालिकेच्या आरोग्य विभागात जाब विचारण्यासाठी आले होते.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत पालिकेच्या आकडेवारीनुसार २ हजार १२७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर केंद्राने अशा नागरिकांच्या कुटुबियांसाठी मदतीचा हात पुढे करीत ५० हजारांची मदत जाहीर केली आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरून ही मदत मिळणार आहे. त्यानुसार ठाण्यातील अनेक मृतांच्या नातेवाईकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याचा प्रयत्न केला. मात्र अर्ज भरताना मृत्यू झालेल्यांची नोंदच आयसीएमआरकडे झाली नसल्याचा मेसेज येत असल्याने अनेक कुटुंबीय हताश झाले आहेत. तर ही साईट ओपन केल्यानंतर नोंद नसेल तर त्याठिकाणी आणखी एक सुविधा उपलब्ध असून त्यानुसार तेथील जीआरसीवर जाऊन क्लिक केल्यावर नातेवाईकांना अपील करण्याची संधी दिली जाते. त्यानंतर अपीलात गेलेल्या अनेकांनी सोमवारी पालिकेच्या मुख्यालयात धाव घेऊन आपली फाईल पुन्हा जमा केली आहे. पालिकेने देखील आलेल्यांचे अपील घेतले असून पुढील प्रक्रियेसाठी किंवा अंतिम मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले आहे.

कोरोना चाचणी करताना रुग्णांचा आधारकार्ड क्रमांकही घेतला जातो. त्यानुसार त्याची चाचणी पॉझीटीव्ह आल्यानंतर त्याची नोंद ही आयसीएमआरकडे होत असते. तशीच मृत्युची नोंद देखील होणे अपेक्षित आहे. मात्र ही चुक कोणाकडून झाली आहे असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पालिकेने रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याची नोंद आयसीएमआरकडे करणे अपेक्षित होते. मात्र त्यांच्याकडूनच ही चुक झाल्याने त्याचा नाहक त्रास मृतांच्या नातेवाईकांना सहन करावा लागत असल्याबाबत भाजपचे माजी नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेकडे आता आम्ही पुन्हा कागदपत्रे सादर केली आहेत. त्यानुसार महापालिका आता आम्हाला कशा पध्दतीने मदत करणार हे पाहावे लागणार असे रवी सिंग (रुग्णाचे नातेवाईक) म्हणाले.