वाहतुकीचे नियम मोडणार नाही; वाहन चालकांनी घेतला धडा

दीड हजार वाहनचालकांचे पोलिसांकडून समुपदेशन

ठाणे : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १४३६ वाहन चालकाना वाहतूक पोलिसांनी दणका दिला असून त्यांचे समुपदेशन करून त्यांना नियमांचे धडे दिले.

सीट बेल्ट न लावणे, सिग्नल तोडणे, हेल्मेट न घालणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात आज वाहतूक पोलिसांनी विषेश ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत १८ ठिकाणी मोहीम राबवली होती. या मोहिमेदरम्यान नियम मोडणाऱ्या वाहन चालकांचे पोलिसांनी समुपदेशन केले. त्यांना वाहतूक नियम पाळण्याची सूचना केली ज्यांनी हेल्मेट घातले नव्हते, त्यांना हेल्मेट देण्यात आले. वाहतुकीचे नियम मोडल्यास जीवावर कशाप्रकारे बेतू शकते याची जाणीव वाहन चालकांना करून देण्यात आली.

या मोहिमेला वाहन चालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नियम मोडणाऱ्या वाहन चालकांनी या पुढे नियम मोडणार नाही, असे वचन या वेळी अनेकानी पोलिसांना दिले.

सिग्नल मोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात सीट बेल्ट आणि हेल्मेट न घालणाऱ्यांचे ७० टक्के अपघाताचे प्रमाण देशात आहे. जीवितहानी होऊ नये म्हणून जनजागृतीची मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळाला असून वाहन चालक नियमांचे पालन करतील, असा विश्वास वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.

ठाणे नगर उपविभागात ८३, कोपरी-७८, नौपाडा-८४, वागळे-५०, कापुराबावडी-९५, कासारवडवली-६३, राबोडी-३३, कळवा-९४, मुंब्रा-९७, भिवंडी-४०, नारपोली-७६, कोनगाव-८२, कल्याण-७५, डोंबिवली-६०, कोळसेवाडी-१०४, विठ्ठलवाडी-८७, उल्हासनगर-११० आणि अंबरनाथ उपविभागात १२५ वाहन चालकांचे समुपदेशन करण्यात आले.