ठामपाचे उत्पन्न वाढवणार; स्वच्छता-आरोग्याला प्राधान्य देणार

आयुक्त सौरभ राव यांनी घेतला विभागवार आढावा

ठाणे : ठाणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त सौरभ राव कामाला लागले असून आज त्यांनी महापालिकेच्या विविध विभागाच्या प्रमुखांशी चर्चा करून महापालिकेची स्थिती जाणून घेतली. आर्थिक डबघाईला आलेल्या महापालिकेची स्थिती सुधारण्याबाबत त्यांनी प्रदीर्घ चर्चा केली. आरोग्य, अतिक्रमण आणि साफसफाई यावर त्यांनी भर दिला.

मागील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आयुक्त राव यांनी महापालिकेचा पदभार स्वीकारला होता. महापालिकेच्या सद्यस्थितीबाबत त्यांना जास्त माहिती नसल्याने त्यांनी लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर प्रदीर्घ चर्चा केली. आर्थिक स्थिती कशी आहे, मागील किती देणी आहेत, महापालिकेच्या तिजोरीत किती निधी आहे, या वर्षाची देयके कशी दिली जाणार आहेत, आगामी वर्षात आर्थिक स्रोत कसा उभा करायचा? मुख्यमंत्री विशेष खासदार आमदार निधीची कामे झाली का? त्याची ठेकेदारांची बिले देण्यात आली का, याबाबत सविस्तर माहिती आयुक्त श्री. राव यांनी जाणून घेतली.

शहरातील साफसफाई, कचरा व्यवस्थापन याबाबत देखिल त्यांनी माहिती घेतली. आरोग्य विभागाबाबत तसेच अतिक्रमणाबाबत आयुक्तांनी गांभीर्याने चर्चा केली. आरोग्य सेवा कशी सुदृढ होईल याबाबत अधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. अनधिकृत बांधकामांबाबत महापालिका कशा प्रकारे कारवाई करते? किती एमआरटीपीचे गुन्हे दाखल करण्यात आले? सध्या अनधिकृत बांधकामाची स्थिती काय आहे? याबाबतची माहिती घेऊन आचारसंहिता काळात अनधिकृत बांधकाम होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देखिल आयुक्त श्री. राव यांनी दिली.

समाजविकास विभाग आणि महिला व बालकल्याण विभागाची चर्चा बाकी असून त्याबाबत उद्या चर्चा होणार आहे. त्यानंतर आयुक्त कामाची दिशा ठरवतील, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.