ठाणे कुणाच्या पारड्यात? महायुतीचे डोळे दिल्लीकडे

ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी सेना भाजपात रस्सीखेच

ठाणे: मुख्यमंत्र्यांचा गड असलेल्या ठाणे लोकसभा मतदार संघात आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडी पुन्हा एकदा विद्यमान खासदारालाच उमेदवारी देणार असल्याचे संकेत असताना महायुतीमध्ये मात्र या जागेवरून खलबते सुरू आहेत. या जागेसाठी शिवसेना आणि भाजपात जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

ठाणे लोकसभा मतदार संघात सर्वाधिक आमदार भाजपचे असल्याने या जागेवर भाजपा दावा करत आहे. तर दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी भाजपकडून खेचून आणलेला ठाणे लोकसभा मतदारसंघ सोडायचा नाही अशी भूमिका शिवसेना शिंदे गटाने घेतली आहे. या जागेवरून दोन्ही पक्ष आग्रही असल्याने याचा निर्णय दिल्लीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचे डोळे दिल्लीकडे लागले आहेत.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील दहा दिवसांत केव्हाही लागण्याची शक्यता आहे. उमेदवार कोणीही असला तरी ही लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होणार आहे. त्यामुळे आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रत्येक पक्षाची कसोटी लागणार आहे.

मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे लोकसभा मतदार संघाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर ठाणेकर एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांचे शहरासह जिल्ह्यात वर्चस्व आहे. त्यामुळे राज्यात मोठा भाऊ असूनही भाजप त्यांना दुखावत नाही. असे असले तरी कल्याण आणि ठाणे लोकसभेचा वाद काही लपून राहिलेला नाही.

भाजपात गेल्यानंतर पुन्हा संधी मिळेल या अपेक्षेने माजी खासदार संजीव नाईक ठाणे मतदारसंघात सक्रीय झाले. नवी मुंबई आणि मीरा भाईंदरवर त्यांची असलेली पकड ही जमेची बाजू आहे. तर दुसरीकडे कट्टर संघविचारी असलेले आणि केंद्राशी जवळीक असलेले विनय सहस्त्रबुद्धे आणि संजय केळकर यांना उमेदवारी मिळावी यासाठी स्थानिक भाजप नेत्यांची इच्छा आहे. महायुतीचा आताचा घटकपक्ष असलेला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडूनही सुरुवातीला माजी खासदार आनंद परांजपे यांच्या नावाची चर्चा होती. पण आता त्यांना राज्यसभेवर जाण्याचे वेध लागल्याने निवडणुकीच्या रिंगणात ते उतरण्याची शक्यता धुसर झाली आहे. असे असले तरी शिवसेना शिंदे गटाने या लोकसभा मतदार संघातील आपला दावा सोडलेला नाही. माजी आमदार रविंद्र फाटक आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या नावाची चर्चा घडवून आणली जात आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघाची चाचपणी भाजपकडून वारंवार होत आहे. या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे सलग दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यात मध्यंतरी गोळीबार प्रकरणामुळे भाजपाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी शिंदे यांचा प्रचार न करण्याची भूमिका घेतली. या सर्व घडामोडीचा वचपा काढण्यासाठी शिंदे गटाकडून ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निमित्ताने दबावतंत्र सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात दोन जागा भाजप आणि एक शिंदे गट अशी सुरू असलेली हवा आता दोन शिंदे गट व एक भाजप या दिशेने वाहू लागली आहे.

२०१४ मध्ये शिवसेना भाजप अशी युती होती. यावेळी मोदी लाटेत शिवसेनेचे राजन विचारे हे विजयी झाले. त्यांनी त्यावेळचे राष्ट्रवादीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार संजीव नाईक यांचा दोन लाख ८१,२९९ मतांनी पराभव केला होता. त्यावेळी नाईक साम्राज्यासमोर उभे राहण्यास कुणी तयार नसताना राजन विचारे यांनी ही हिंमत दाखवली होती. २०१९ मध्येही विचारे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांचा तब्बल चार लाखांच्या मतांनी पराभव केला होता. यावेळी विचारे यांच्या मतांमध्ये वाढ झालेली पहावयास मिळाली.

आता केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचे बळ नक्कीच वाढणार आहे. याशिवाय मतदारसंघामध्ये सर्व आमदार महायुतीचे आहेत. तर महाविकास आघाडीचा सध्या एकही आमदार नाही. असे असले तरी मध्यंतरी झालेल्या राजकीय घडामोडीमुळे तळागाळातला कार्यकर्ता आणि मतदार मूळ पक्षांशी जोडल्याचे सर्व्हेतून दिसून आले आहे. त्यामुळे राजकीय ताकदीचे परिवर्तन मतांमध्ये करणे महायुतीसाठी कसोटीचे असणार आहे.

नाईक कुटुंब साईड ट्रॅकवर
शिवसेना, राष्ट्रवादी आणि आता भाजप असा प्रवास करणारे गणेश नाईक यांचा स्वतःचा दबदबा आहे. एकेकाळी ठाण्याचे पालकमंत्री म्हणून त्यांचा दरबार गाजायचा. पण आता परिस्थिती बदलली आहे. २०१४ पासूनच त्यांच्या राजकीय वर्चस्वाला सुरुंग लागण्यास सुरुवात झाली आहे. भाजपमध्ये गेल्यानंतरही ही स्थिती सुधारलेली नाही. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे सलोख्याचे संबंध नसल्याचेही दिसते. मध्यंतरी महायुतीच्या निर्धार मेळाव्यात गणेश नाईक यांना बोलू दिले नव्हते. पंतप्रधान यांची नवी मुंबईत जाहिर सभा घेण्याची इच्छाही मुख्यमंत्र्यांनी हाणून पाडल्याची चर्चा आहे. त्यामुळे संजीव नाईक यांचे खासदार म्हणून पुर्नवसन करण्याचे स्वप्न सत्यात उतरते की नाही हे आता पहावे लागणार आहे.