राजकीय हस्तक्षेपाची शक्यता
ठाणे : महापालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा शेकडो हरकतींनी गाजल्यानंतर आणि त्यावर सुनावणी झाल्यानंतर जाहीर होणारा नवीन अंतिम आराखडा महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार याचा अंदाज व्यक्त करणार आहे. हा प्रारूप आराखडा ५ मार्चनंतर निवडणूक विभागाकडे सादर केला जाणार असून तत्पूर्वी प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप होण्याची शंका व्यक्त होऊ लागली आहे.
ठाणे महापालिकेने सादर केलेल्या प्रारुप प्रभाग रचना आराखड्यावर 1962 हरकती प्राप्त झाल्या होत्या. यात शिवसेना आणि राष्ट्रवादीत चांगलीच जुंपली. मुंब्य्रातील एक प्रभाग चार सदस्यांचा करुन दिव्यात नगरसेवक कमी करण्यात आल्याने शिवसेनेने आक्षेप घेतला होता. तर राष्ट्रवादीनेही शिवसेनेवर आरोप केला होता. मात्र आता सुधारीत प्रभाग रचनेत पुन्हा बदल होण्याची चर्चा रंगू लागली. दिव्यात एक नगरसेवक वाढविण्याबरोबर वागळेतही नगरसेवक वाढवितांना मुंब्य्रातील चार सदस्यांचा वॉर्ड हा वागळेत स्थलांतरित करण्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे मुंब्रा, कौसातील नगरसेवक कमी होऊन त्याचा फायदा पुन्हा शिवसेनेला अधिक प्रमाणात होऊ शकतो, असे चित्र पुन्हा या निमित्ताने तयार झाले आहे. परंतु आलेल्या सुचना-हरकतींवर काम करुन त्यानुसार सुधारीत आराखडा तयार करण्यासाठी पालिकेला आणखी काही दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यानुसार येत्या 5 मार्च रोजी सुधारीत आराखडा सादर केला जाणार असल्याचे पालिकेच्या सुत्रांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान हरकती- सुचनांची दखल घेतली जाणार का? अशी शंका तक्रारदारांच्या मनात उत्पन्न झाली आहे. दखल न घेता सोयीप्रमाणे रचना झाल्यास महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार याचाही कयास बांधता येणे शक्य होणार आहे.