वाढीव मते कोणाला तारणार; कोणाचा घात करणार?

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील सर्व १८ मतदारसंघामध्ये यंदा अंदाजे साडेसात टक्के मतदान वाढले आहे. प्रसन्न झालेला मतदार राजा यंदा कोणाचा घात करणार आणि कोणाला तारणार, याची उत्कंठा शिगेला ताणली गेली आहे.

ठाणे जिल्ह्यात १८ विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातून सुमारे २४४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी चार ते पाच उमेदवारांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली. पण एकंदरीत झालेली बंडाळी आणि अपक्ष उमेदवारांमुळे डोकेदुखी अखेरपर्यंत कायम होती. याचा परिणाम मतदानावरही झालेला पहायला मिळाला आहे. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकसंघ असलेली शिवसेना, भाजप युती आणि राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडी तुटली होती. त्यामुळे हे चारही प्रमुख पक्षासह मनसे आणि छोटे-मोठे पक्ष मैदानात उतरले. परिणामी मतदानाचा टक्का हा ५० टक्क्यांपेक्षा पुढे होता. पण २०१९ साली पुन्हा युती- आघाडी झाल्यामुळे विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळाली. तेव्हा निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट होते. पण २०२४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे दोन गट आमने- सामने आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट महायुती आणि शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट महाविकास आघाडी अशी थेट लढत आहे. यामध्ये मनसेचे इंजिनही धावले. प्रत्येक पक्षात बंडखोरी झाली. ही बंडखोरी रोखण्यात फारसे यश आले नाही. त्यामुळे अपक्षांची संख्याही कमालीची वाढली.

सहा मतदारसंघांमध्ये १७ पेक्षा जास्त उमेदवार मैदानात होते. उर्वरित मतदारसंघामध्येही उमेदवारांची संख्या लक्षणीय होती. त्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्काही वाढणार हे अपेक्षित होते. त्याप्रमाणे २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये मतदानात साडेसात टक्क्यांची वाढ झाली आहे. असे असले तरी सध्या हातात असलेल्या टक्केवारीवरून अंदाजाचे पुल बांधले जात आहेत. या निवडणुकीत सुमारे १७ आजी आमदार पुन्हा रिंगणात होते. त्यांना तितक्याच ताकदीची टक्कर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी यंदा दिल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे मतदानाआधी झालेल्या प्रचारावरून विजयाचे काही अंदाज बांधण्यात आले. पण मतदानाआधी झालेल्या घडामोडीमुळे अनेक मतदारसंघाचे गणित पुन्हा विस्कळीत झाले आहे. त्यामुळे नेमका कुणाला फटका बसणार आणि कोण विजयी ठरणार याचे चित्र अस्पष्ट आहे.

ठाणे जिल्ह्यात महायुतीचे सर्वाधिक १४ आमदार आहेत. तर महाविकास आघाडीकडे दोन विद्यमान आमदार आहेत. अपक्ष एक आणि मनसेचा एक असे एकूण जिल्ह्याचे बलाबल आहे. पण या निवडणुकीतही महायुतीचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील यात शंका नाही. पण काही जागांवर नुकसान सहन करावे लागणार असल्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या खात्यात वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषतः नवी मुंबई आणि कल्याण, भिवंडीच्या ग्रामीण भागात धक्कादायक निकाल लागण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

एरोली, बेलापूर, कल्याण ग्रामीण, मीरा- भाईंदर, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, मुरबाड, भिवंडी ग्रामीण, अंबरनाथ, शहापूर, उल्हासनगर आदी मतदारसंघातील विद्यमान आमदारांभोवती धोक्याची घंटा घोंगावत असल्याचे दिसते. ठाणे, कोपरी- पाचपाखाडी, ओवळा- माजिवाडा, कळवा- मुंब्रा, डोंबिवली, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व या मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या लढतीमध्ये काही अपक्षही निवडून येण्याची शक्यता आहे. पण हा केवळ ग्राऊंड रिपोर्टचा अंदाज आहे. खरी परिस्थिती २३ नोव्हेंबरच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

वास्तविक मतदानाआधी बांधलेले अंदाज आणि मतदानानंतरची परिस्थिती ही पूर्णपणे वेगळी आहे. अखेरच्या क्षणापर्यंत एक एक मत मिळवण्यासाठी संबंधित पक्षाचे नेते, उमेदवार आणि कार्यकर्ते झटत होते. पण शांत आणि संयमी मतदारांच्या मनात नेमके काय चालले आहे, याचा ठावठिकाणा लागत नव्हता. परिणामी यंदा मोठ्या मताधिक्यांऐवजी अटीतटीचा सामनाच अधिक रंगलेला आहे.