नवी मुंबई: ऐरोली मतदारसंघात आमदार गणेश नाईक यांचा आपल्या पूर्वाश्रमीच्या दोन शिष्यासोबत सामना रंगणार असून यात गुरू बाजी मारतो की शिष्य हे २३ नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल.
कामगार नेता म्हणून १९७८ ते १९८० दरम्यान गणेश नाईक यांची ओळख निर्माण झाली. १९८५ साली त्यांनी पहिल्यांदा अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवली आणि त्यांना काँग्रेसच्या जनार्दन गौरी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर १९९० ला नाईक यांनी धनुष्यबाण हाती घेतले आणि आमदार झाले. १९९५मध्ये पुन्हा शिवसेनेतून निवडून आल्यानंतर नाईक यांना पर्यावरण मंत्री व ठाण्याचे पालकमंत्री बनवण्यात आले. मात्र १९९७ मध्ये बाळासाहेब ठाकरे आणि नाईक यांच्यात बिनसलं आणि १९९९ला नाईक यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत हाती शरद पवारांचे घड्याळ बांधले. मात्र यावेळी देखील शिवसेनेच्या सीताराम भोईर यांच्याकडून गणेश नाईक यांना पराभव पत्करावा लागला होता. हा निकाल कट रचून लावला गेल्याचा आरोप नाईक यांनी केला होता आणि तो आजही कायम आहे. त्यामुळे ती मतमोजणी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.
या दरम्यान नाईक यांनी कच न खाता पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केली आणि २००४ आणि २००९ असा सलग दोन वेळा विजय संपादित केला. मात्र २००७ साली नाईक यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू शिष्य असे विजय चौगुले यांनी नाईक यांची साथ सोडून हाती धनुष्यबाण घेतले व २००९ च्या लोकसभा निवडणुकीत संजीव नाईक यांच्या विरोधात लढले आणि पराभव झाला. तर २००९ व २०१४ असे सलग दोन वेळा विजय चौगुले यांना संदीप नाईक यांनी विधानसभा निवडणुकीत पराभवाची धूळ चारली. २०१५ ला नाईक यांचे दुसरे शिष्य एम. के. मढवी यांनी नाईकांची साथ सोडली. २०१९मध्ये नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि महायुतीमधून निवडणूक लढवली. मात्र आता उबाठा आणि शिंदे गट असे सेनेचे दोन भाग झाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतर्फे एम.के.मढवी यांना अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. तर महायुतीत बंडखोरी करत विजय चौगुले यांनी अपक्ष अर्ज भरून नाईक यांना आव्हान दिले आहे. त्यामुळे एकेकाळी आपले शिष्य असलेले चौगुले आणि एम. के.मढवी यांच्या सोबत नाईक यांना आता दोन हात करावे लागतील. त्यामुळे गुरु शिष्यांच्या लढाईत कोण बाजी मारतो याचे चित्र येत्या २३ नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल