आमदार जितेंद्र आव्हाड यांची टीका
ठाणे : भारताने काय करायचे हे सांगणारे अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प आहेत तरी कोण? त्यांच्या सांगण्यावरून ‘ते’ २६ जीव पुन्हा येणार आहेत की आणणार आहात, असा संताप व्यक्त करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका केली आहे.
पेहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. त्याला उत्तर म्हणून पाकिस्तान विरोधात रणशिंग फुंकत भारतीय लष्कर आपली कामगिरी बजावत असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केली. यावरून राजकारण तापले असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मादी यांनी सोमवारी जनतेला संबोधून भूमिका स्पष्ट केली. पण ही निव्वळ सारवासारव असून या कृत्याची सल प्रत्येक भारतीयांच्या मनात असल्याची खंत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात बोलून दाखवली. ते म्हणाले की, ट्रम्प यांनी जाहिररित्या भारताला धमकावले असे सांगितले. हा सर्व भारतीयांचा अपमान आहे. आम्ही घाबरणारी जमातच नाही. कोण आहे ट्रम्प? ते आमचे परराष्ट्रीय धोरण ठरवणार असतील तर भारताने गुलामगिरी पत्करण्यास सुरुवात केली आहे, हेच यावरून दिसते असे ते यावेळी म्हणाले.