ठाण्यात अजित पवार गटाच्या पाठीशी कोण-कोण?

कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त
होणार जोरदार शक्तीप्रदर्शन

ठाणे: ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या गटाच्या पहिल्या कार्यालयाच्या उदघाटनाच्या आमंत्रण पत्रिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच माजी नगरसेवकांना पाठविण्यात आल्या आहेत. त्यापैकी किती नगरसेवक अजित पवार यांच्या बरोबर आहेत हे उद्या कळणार असून या गटाने जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी केली आहे.

विवियाना मॉलच्या समोरील फ्लॉवर व्हॅली गृहसंकुलामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ठाण्यातील पाहिले कार्यालय तयार करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्धाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. त्याची जोरदार तयारी नजीब मुल्ला आणि शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत पदाधिकारी, युवक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांबरोबरच माजी नगरसेवक-नगरसेविका यांना खास आमंत्रित करण्यात आले आहे, परंतु माजी नगरसेवक सुहास देसाई यांना मात्र आमंत्रित करण्यात आलेले नाही.

उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शक्तीप्रदर्शन करून ठाण्यात देखिल अजित पवार यांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी आणि कार्यकर्ते असल्याचे दाखवून दिले जाणार आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर महिला पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत नजीब मुल्ला आणि आनंद परांजपे यांनी आगे आगे देखो, होता है क्या असे सांगत संकेत दिले होते. त्यामुळे उद्या काही आ.जितेंद्र आव्हाड समर्थक, माजी नगरसेवक आणि पदाधिकारी अजित पवार यांना पाठिंबा देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. तर आ.आव्हाड त्यांच्या समर्थकांना कसे थोपवून ठेवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.