लोकलमधून पडून प्रवाशांच्या वाढत्या मृत्युमुळे प्रवासी संघटना संतप्त
अंबरनाथ : लोकलमधील दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे दररोज किमान एक ते दोन प्रवासी धावत्या लोकलमधून पडून मृत्यूला सामोरे जात आहेत तर काहींना कायमचे अपंगत्व येते. प्रवासी वाहन क्षमता तत्काळ वाढविण्यासाठी १५ डब्यांच्या लोकल फेर्या वाढविणे गरजेचे आहे.
बदलापूर आणि टिटवाळा मार्गावर धावणाऱ्या सर्व लोकल १५ डब्यांच्या करण्याचा प्रकल्प नेमका कुठे अडकला आहे? असा सवाल प्रवासी महासंघाने रेल्वे प्रशासन आणि महानगर प्रदेशातील खासदारांना केला आहे.
कल्याण ते मुंबई 15 डबा लोकल सुरू केल्यानंतर वाढणारी गर्दी व नियमित होणारे अपघात पाहून टर्मिनल स्थानके असलेल्या बदलापूर व टिटवाळा या सर्व लोकल 15 डब्यांच्या कराव्यात, अशी मागणी रेल्वे प्रवासी महासंघाने प्रथम मध्य रेल्वे प्रशासन आणि रेल्वे बोर्डाकडे केली असल्याची माहिती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मनोहर शेलार यांनी दिली. संघटनेची . मागणी योग्य असल्याचे पाहून मध्य रेल्वे प्रशासनाने यासाठी सर्व शक्यता तपासून यासंबंधी एक प्रकल्प अहवाल तयार करून तो रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. अहवाल सादर करून तब्बल सहा वर्षे झाली असून अजून या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलेली नाही.
425 कोटी रुपये खर्च असलेल्या या प्रकल्पात शहाड, आंबिवली, टिटवाळा, तसेच विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या स्थानकांच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढविणे आणि सिग्नल यंत्रणा बदलणे या प्रमुख कामांसह अन्य प्रवासी सुविधांचा समावेश आहे.
लोकल प्रवाशांची वाढती संख्या आणि दररोज होणारे अपघात पाहता प्रस्तावित प्रकल्पाची मंजुरी व अमलबजावणी युद्धपातळीवर पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी) प्रकल्पात रेल्वेने वातानुकूलित लोकल चालविण्याचा अट्टाहास धरल्यामुळे हा प्रकल्प मुद्दामहून रोखला आहे, असा आरोप प्रवासी महासंघाने केला आहे. एमयूटीपी प्रकल्प क्रमांक तीनमध्ये रेल्वे तब्बल 145 वातानुकूलित लोकल खरेदी करणार असून त्यामुळे मागील अनेक वर्षे साध्या लोकल उपनगरीय सेवेत येतच नाहीत. परिणामी शक्य असूनही ठाणे किंवा कल्याण स्थानकातून कर्जत आणि कसारा मार्गावर मागील दहा वर्षे एकही लोकल फेरी वाढलेली नाही. प्रवाशांचे दरवर्षी शेकडो बळी घेणारा रेल्वेचा अनागोंदी कारभार संतापजनक असून मुंबई महानगर प्रदेशातील खासदारांचे नियंत्रण रेल्वेच्या कारभारावर नसल्याबद्दल श्री. शेलार यांनी संताप व्यक्त केला.
बदलापूर आणि टिटवाळा 15 डबा लोकल प्रकल्प तत्काळ मंजूर करून त्याची युद्धपातळीवर पूर्तता करावी यासाठी परिसरातील सर्व नवनिर्वाचित खासदारांनी लोकसभेत आवाज उठवावा आणि लोकल प्रवाशांना न्याय द्यावा, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष आणि उपनगरीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे माजी सदस्य शेलार यांनी केले आहे.
जानेवारी ते मार्च 2024 या तीन महिन्यांतच मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलमधून गर्दीमुळे पडून तब्बल 94 निष्पाप प्रवासी मरण पावले आहेत. तर अनेक जण कायमचे अपंग होऊन त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. हे सर्व भयानक असून ही आपली राष्ट्रीय हानी आहे. 15 डबा लोकलमुळे यात निश्चितच फरक पडेल.