नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मराठीत बिले कधी देणार

नवी मुंबई: नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्य व मसाला मार्केटमध्ये ग्राहकांना मिळणाऱ्या गुजराती बिलांविरोधात मराठी एकीकरण समितीने (महाराष्ट्र राज्य) आवाज उठवला असून, ही बिले मराठी भाषेत व्यापाऱ्यांनी न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा एपीएमसी प्रशासनाला दिला आहे.

मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. त्यामुळे नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व बाजारांमध्ये मराठी भाषेचा दैनंदिन व व्यावहारिक वापर करणे अनिवार्य असल्याचे समितीने निवेदनात म्हटले आहे. ग्राहकांना देण्यात येणारी कृषी मालाची बिले सुद्धा मराठी भाषेतच असावीत असा शासनाचा नियम असल्याचे समितीचे नवी मुंबई अध्यक्ष यागेश मोहन यांनी सांगितले.

याबाबत एपीएमसी प्रशासनाला या आधीही निवेदने दिली आहेत. मात्र यावर कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे यावर तत्काळ कार्यवाही करून मराठीत बिले दिली नाहीत तर मराठी एकीकरण समितीतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा यागेश मोहन यांनी दिला आहे.