आमदार संजय केळकर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना भेटले
ठाणे : ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्यासाठी चार वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आला होता. परंतु या कामाला अजून सुरुवात झालेली नाही. आमदार संजय केळकर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन लवकरात लवकर याचे बांधकाम सुरू करण्याची मागणी केली.
ठाणे शहरासह ठाणे-पालघर जिल्ह्यातील रुग्णांना योग्य आणि पुरेशी वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नसल्याने त्याचे प्रचंड हाल होत आहेत. या संदर्भात आमदार संजय केळकर यांनी २१ एप्रिल रोजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ही बाब निदर्शनास आणून दिली. ९०० खाटांचे हे हॉस्पिटलसाठी ५२७ कोटी खर्च अपेक्षित आहे. मात्र फक्त २७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. परंतु काम अद्यापही सुरू नसल्याने हजारो गरीब गरजू रुग्ण सुविधांपासून वंचित राहत आहेत. या रुग्णालयाचे बांधकाम लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी आमदार केळकर यांनी केली.
नारळ फोडायची घाई प्रत्यक्ष काम सुरु नाही असे होऊ नये. याची काळजी आपण घ्यावी, असा सल्ला देखील आ. केळकर यांनी आरोग्य मंत्र्यांना दिला. तथापि आ. केळकर यांच्या येथील रुग्णालयाचे बाबतीतील तीव्र भावना लक्षात घेऊन हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बैठक आयोजित करून या कामाला गती देण्यात येईल, असे आश्वासन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आमदार संजय केळकर यांना दिले.