आपल्या मुलांच्या चुका पदरात घेणारी आणि वेळप्रसंगी मुलांची ढाल होणारी, ही आईची दोन रुपं. मुलांच्या जीवावर बेतल्यावर काहीही करायला तयार असणारी आई आणि तिची रूपं ‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे. स्वतः ला झालेला त्रास आई एकवेळेस सहन करेलही पण तिच्या मुलांच्या वाटेला कोणी गेलं तर ती वाघीण व्हायला देखील मागेपुढे बघणार नाही.
आपल्या मुलासाठी जिवाची बाजी लावून गड उतरलेली हिरकणी असो किंवा स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती शिवरायांना धडे देणाऱ्या जिजामाता असो. आईचं अस्तित्व तिच्या मुलासाठी नेहमीच कवच बनलं आहे. असच जेव्हा स्वतः च्या मुलीचा जीव धोक्यात आहे हे समजत तेव्हा एक आई दूर्गेच रूप धारण करून असुरांचा नाश करण्याची शपथ घेते तेव्हा पुन्हा सिद्ध होतं की आई मुलासाठी काहीही करू शकते. एक शिक्षिका, एक कर्तव्यदक्ष आई आणि स्वतःच्या मुलीच्या जीवावर बेतल्याने वाघीण झालेली आई या अशा धाडसी भूमिकेत मधुरा दिसणार आहे. २० डिसेंबरपासून, सोम.-शनि. रात्री १० वा. प्रेक्षकांना ही मालिका पाहायला मिळणार आहे.
आतापर्यंत वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांसाठी आणणारी सोनी मराठी वाहिनी पहिल्यांदाच थरार मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. ‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेचे कथा-पटकथा लेखन अभिनेता आणि लेखक चिन्मय मांडलेकर, तर संवाद लेखिका मुग्धा गोडबोले लिहीत असल्याने ते संवाद मनाला भिडणारे असतील यात शंका नाही. पहिल्यांदाच सोनी मराठी वाहिनी अशा प्रकारची एक थरारक मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. मालिकेची निर्माती मनवा नाईक असून, राष्ट्रीय पुरस्कार विजते दिग्दर्शक भीमराव मुडे मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत.
उत्तम निर्माती, अनुभवी दिग्दर्शक, लोकप्रिय लेखक आणि उत्कृष्ट कलाकार यांचे मिश्रण असलेली ‘तुमची मुलगी काय करते’ ही मालिका प्रेक्षकांना सोनी मराठी वाहिनीवर लवकरच बघायला मिळणार आहे. पाहा, ‘तुमची मुलगी काय करते’ २० डिसेंबरपासून, सोम.-शनि. रात्री १० वा. आपल्या सोनी मराठीवर.