ठाणेवैभव क्रिकेट करंडक स्पर्धा
ठाणे : बिनेट कम्युनिकेशन संघाच्या सागर मुळे आणि प्रथमेश बेलचडाच्या प्रत्येकी तीन बळींमुळे वेस्टर्न रेल्वे ट्रॅफिक संघाला शंभर धावांचा टप्पा देखील ओलांडता न आल्याने बिनेट कम्युनिकेशनने सामना अलगद खिशात टाकला.
ठाणेवैभव आंतरकार्यालयीन क्रिकेट करंडक स्पर्धेच्या क गटातील सामन्यात बिनेट कम्युनिकेशन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारली. या सामन्यात संघाच्या गोलंदाजांनी वेस्टर्न रेल्वे ट्रॅफिक संघावर शेवटपर्यंत वर्चस्व राखले. प्रथमेश बेलचडा याने अवघ्या सात चेंडूंत फक्त दोन धावा देत तीन बळी घेतले तर सागर मुळ्ये याने सात षटकांत १६ धावा देत तीन फलंदाज बाद केले. दीपक भोगले याने दोन तर कायदिन प्रभू याने एक गडी बाद केला. बिनेट कम्युनिकेशन संघाच्या गोलंदाजांच्या तिखट माऱ्याचा सामना संपूर्ण संघ घसरला. एकमेव आशिष घरत या फलंदाजाने सर्वाधिक २९ धावा करत संघाचे अस्तित्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. मात्र सात फलंदाजांना एक अंकी धावसंख्याच करता आली. त्यामुळे वेस्टर्न रेल्वे ट्रॅफिक संघाला ९६ धावांत गुंडाळण्यात बिनेट संघाला यश आले.
बिनेट संघाने वेस्टर्न रेल्वे ट्रॅफिक संघाचे ९६ धावांचे आव्हान १६.२ षटकांत आणि तीन फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. यात सुशांत कदम याच्या नाबाद ४२ धावा तर अभिनव जगताप याच्या ३१ धावांचे योगदान आहे. वेस्टर्न रेल्वे ट्रॅफिक संघाचा अतिश वालिंजकर याने सात षटकांत ३० धावा देत तीन गडी बाद केले. अन्य एकाही गोलंदाजाला बळी मिळवता आला नाही.