ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावरून ठाणे शहरात प्रवेश करताना प्रवेशद्वारावरच विद्युत रोषणाई असलेल्या दीपमाळा उभारण्यात आल्या आहेत. नागरीकांचे आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी या दीपमाळांचे विद्युत दिवे प्रज्वलित करण्यात आले असून संध्याकाळनंतर या दिपमाळांचे मनोहारी दृश्य ठाणेकरांचे लक्ष वेधून घेत आहे.
ठाणे महानगरपालिकेने या दोन दीपमाळांची उभारणी केली आहे. आनंदनगर आणि कोपरी सेवा रस्ता अशा दोन ठिकाणी दोन भव्य दगडी दीपमाळा उभारण्यात आल्या आहेत. दीपमाळांच्या पायथ्याचा षटकोनी व्यास सहा मीटरचा असून त्याला सहा कमानी आहेत. प्रत्येक दीपमाळेची उंची २५ मीटर एवढी आहे. त्याचे फ्रेम वर्क आरसीसीचे आहे. त्यावर, ॲशलर दगडाचे प्रमाणबद्ध क्लॅडींग केले आहे. या संपूर्ण दीपमाळांची उभारणी, आराखडा, आरसीसी बांधकाम, ॲशलर दगड, विद्युत यंत्रणा आदी कामाचा या प्रकल्पात समावेश आहे.
प्रत्येक दीपमाळेवर १४४ लाईटचे आर्मस् (ज्योती) आहेत. तसेच, प्रत्येक दिपस्तंभाला दोन किलो वॅटचे एलईडी दिवे लावण्यात आले आहेत. त्याच्या मंद प्रकाशामुळे ही दीपमाळ प्रज्वलित झालेली दिसते आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तसेच ठाणे शहरात येणाऱ्या नागरिकांचे स्वागत करण्यासाठी या दीपमाळा सज्ज झाल्या आहेत.