ठाणे : राज्यातील सत्तापेच अजूनही कायम असून १ ऑगस्टपर्यंत सुनावणी पुढे ढकलली गेली आहे. यावेळी सरन्यायाधीशांना काही महत्वांच्या बाबींची नोंदही केली. त्यानुसार या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा समाधानकारक असल्याचे सांगत न्यायालयाने प्रतिज्ञापत्रक सादर करण्यास सांगितले असून या निर्णयाचे आम्ही स्वागत करत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
ठाण्यातील निवासस्थानाहून मुंबईला जात असतांना पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. राज्यातील सत्ता संघर्षावर बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यात तीन न्यायमुर्तीच्या खंडपीठाने शिवसेना, शिंदे गट आणि राज्यपालांच्या वतीने बाजू मांडणाऱ्या वकीलांचा युक्तीवाद ऐकूण घेतला आणि या प्रकरणाची सुनावणी १ ऑगस्ट रोजी होणार असल्याचे म्हंटले आहे. त्यावर शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांनी जे काही सरकारच्या विरोधात काही मुद्दे मांडले होते, त्याला दिलासा दिलेला नाही. त्यामुळे सरकार स्थापन करण्यापासून, विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षांच्या निवडीपर्यंत जे काही आम्ही केले आहे, ते कायदेशीररित्या केलेले आहे, घटनेच्या नियमाप्रमाणे केलेले आहेत. त्यामुळे न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
ओबीसी आरक्षणाबाबत बांठीया आयोगाने जे काही काम केले आहे, ते योग्य पध्दतीने केलेले आहे. ओबीसींना न्याय मिळाला हवा, ही सरकारची देखील भुमिका असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार सर्वोच्च न्यायायल त्यावर योग्य तो निर्णय देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तर पुरपरिस्थतीचा आढावा हा रोजच्या रोज घेतला जात आहे. येथील लोकांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी सरकार घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर राज्यात लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.