विटाव्याची भारोत्तोलक सुश्मिता देशमुखचा राष्ट्रीय विक्रम

पंजाबमधील चॅम्पियनशिप स्पर्धेत तीन सुवर्ण आणि एक कांस्य

ठाणे : कळव्यातील विटावा गावात राहणारी सुश्मिता देशमुख हिने 19 फेब्रुवारी रोजी पंजाबात पार पडलेल्या ओपन क्लासिक पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत 136 किलो स्क्वॉट स्वतःच्या नावावर नोंदवत राष्ट्रीय विक्रमासह तीन सुवर्ण, एक कांस्यपदकाची कमाई केली.

19 फेब्रुवारी 2025 रोजी, लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, फगवारा, पंजाब येथे पॉवर लिफ्टिंग इंडिया असोसिएशन यांच्या मान्यतेने, एसबीडी इंडियन ओपन क्लासिक पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 झाली. सुस्मिता हिने 19 फेब्रुवारी 2025 रोजी सीनियर गटात, 52 किलो वजनी गटात स्वतःचे वजन 48.16 किलो असताना खेळली. यावेळी तिने स्क्वॉट या प्रकारात 135 किलो जुना विक्रम मोडून 136 किलो स्क्वॉट स्वतःच्या नावावर केला. तसेच स्क्वॉट या प्रकारात सुवर्णपदक, बेंचप्रेस या प्रकारात सुवर्णपदक डेडलिफ्ट या प्रकारात कांस्य पदक आणि 52 किलो वजनी गटात 346 किलो वजन उचलून (राष्ट्रीय विजेते) सुवर्णपदक पटकावले. येथे तिने एक राष्ट्रीय विक्रम, तीन सुवर्णपदक आणि एक कांस्यपदक कमाई केली.

याआधी सोलापूर येथे झालेल्या सीनियर महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राची सर्वोत्तम महिला खेळाडू 2025 आणि सुवर्णपदक पटकावले होते. तिच्या या यशाचे श्रेय प्रशिक्षक निलेश भोईर, आई-वडील वंदना आणि सुनिल देशमुख यांना ती देते. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक विक्रमांना गवसणी घालणार्‍य सुश्मिताला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. हाँगकाँगला आंतरराष्ट्रीय ओपन पॉवर लिफ्टिींग चॅम्पियनशिप स्पर्धेतही तिची निवड झाली होती. मात्र आर्थिक अडचणीमुळे ती या स्पर्धेत भाग घेऊ शकली नाही.