अंबरनाथला निवडणुकीची दहीहंडी आम्हीच फोडणार

अरविंद वाळेकर यांची ग्वाही

अंबरनाथ : दोन महिन्यांवर येऊन ठेपलेली विधानसभा निवडणुकीची दहीहंडी आम्हीच फोडणार, असे प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी केले.

शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून यंदाही आयोजक शहरप्रमुख अरविंद अरविंद वाळेकर यांच्या वतीने एक लाख 11 हजार रुपये रकमेचे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल त्यातच परिसरातील गोविंदा पथकांचा दहीहंडी फोडण्यासाठीचा थरार बघण्यास शहरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

यावेळी बोलताना श्री. वाळेकर म्हणाले की, येत्या दोन महिन्यात विधानसभेची निवडणूक जाहीर होणार आहे, ही निवडणूकरुपी दहीहंडी आम्हीच फोडणार अशा शब्दात विरोधकांना टोला लगावला. श्रीकृष्णाला जशी त्याच्या सवंगड्यांची साथ लाभली तशीच शहरातील शिवसैनिकांची मजबूत साथ आपल्या साथीला असल्याने कसलीही काळजी करण्याची गरज वाटत नाही, दहीहंडी फोडण्यासाठी पहिला थर मजबूत असावा लागतो तसा मजबूत थर भक्कम उभा आहे, असेही श्री. वाळेकर म्हणाले.

माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, युवा सेनेचे पदाधिकारी ॲड. निखील वाळेकर, प्रकाश डावरे, बाळा मालुसरे, पद्माकर दिघे, संभाजी कळमकर, मिलिंद गान, आदी पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.