* एमआयडीसीने भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांची मागणी
* तीन दिवसांपासून उपोषण सुरू
अंबरनाथ: ज्या जमिनी पिढ्यानपिढ्या सांभाळून ठेवल्या, त्या शेत जमिनीचा मोबदला घेऊन काय करणार? आम्हाला जमिनीचा मोबदला नको, जमिनी परत करा. अशी मागणी करत पालेगाव आणि फणशीपाडा येथील शेतकरी एमआयडीसी भूसंपादन विरोधात गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषणास बसले आहेत.
एमआयडीसीचा विस्तार आणि लघु उद्योगासाठी एमआयडीसीने अंबरनाथ तालुक्यातील मौजे पाले मधील ७८.६४ हेक्टर (१९४ एकर जागा) शेतकऱ्यांना आवश्यक मोबदला देऊन भूसंपादन केली होती, मात्र त्यातील काही शेतकऱ्यांनी जमिनीचा मोबदला न घेता आमच्या शेतजमिनी आम्हाला कसायच्या असून त्या परत द्या, अशी भूमिका घेऊन त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. उपोषणाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी देखील एमआयडीसी अथवा शासनाचा प्रतिनिधी उपोषण ठिकाणी फिरकला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
भूसंपादनाच्या विरोधात आमरण उपोषणास बसलेल्या बाळाराम सांबारे परिवाराची १८ एकर जमीन एमआयडीसीने ताब्यात घेतली आहे. मात्र ही जमीन शेतीची जमीन असून आम्हाला ती परत द्या, अशी भूमिका सांबारे परिवाराने घेतली आहे. त्यामुळे आता एमआयडीसीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
एमआयडीसीसाठी ताब्यात घेतलेल्या जमिनीचा मोबदला न्यायालयात जमा केला आहे. प्रांत कार्यालयात अर्ज करून संबंधित शेतकऱ्यांनी मोबदला घ्यायचा आहे, अशी माहिती एमआयडीसीचे विभागीय अधिका री सुनील भुताळे यांनी दिली.