तुमचे प्रचारक आम्हीच!

५० गृहसंकुलांचे डाॅ. जितेंद्र आव्हाड यांना समर्थनाचे पत्र

ठाणे : एकीकडे प्रचारासाठी इमारतींचे मजले चढताना उमेदवारांना घाम फुटत असतानाच तुमचे प्रचारक आम्हीच आहोत. तुम्ही प्रचार करू नका ! तुम्ही राज्य पहा. आम्ही मतदारसंघ पाहतो. तुमची निवडणूक आम्ही हातात घेतो. तुतारी वाजवणारा माणूस घराघरात पोहचवितो, अशा आशयाचे समर्थन पत्र राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे मुंब्रा-कळवा येथील उमेदवार जितेंद्र आव्हाड यांना ५० पेक्षा अधिक गृहसंकुलांनी दिले आहे.

2009 चे आणि आताचे मुंब्रा-कळवा यात जमीन-अस्मानाचे अंतर दिसत आहे. आमच्या घरांच्या किमती आणि राहणीमान प्रचंड उंचावले आहे. ही सर्व तुमचीच मेहनत आहे. म्हणूनच आमचे एकमताने तुम्हाला समर्थन आहे. तुम्ही आमच्या विभागात प्रचार करू नका. आम्हीच तुमचे प्रचारक आहोत. तुम्हाला प्रचाराची गरज नसून तुम्ही केलेले कामच सारं काही सांगत आहे, असे म्हणत, आम्ही ही जनचळवळ सुरू करीत आहोत, आता आमच्यासारख्या सामान्य जनतेने तुमची निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे तुमचा प्रचार आम्ही करू; तुम्ही फक्त महाराष्ट्र फिरा, असे पत्र दिले आहे.