मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकारणाशी केली बुद्धिबळाची तुलना
ठाणे: जनता माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही बुद्धी लावली, तरी ते मला चेकमेट करू शकत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
रोटरीच्या स्पर्धेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका विशेष संदेशाद्वारे शुभेच्छा देत विश्वनाथ आनंद यांचे स्वागत केले. त्यावेळी त्यांनी नाव न घेता विरोधकांनाही चिमटे काढले. एकनाथ शिंदे म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून विरोधक मला चेकमेट करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. परंतु, जनतेचा पाठिंबा कायम माझ्यासोबत आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही आपली बुद्धी लावली तरी ते माझं काहीच करू शकत नाही. राजकारणामध्ये बुद्धिबळ खेळणं अत्यंत सोपं झालं आहे. मात्र, या ठिकाणी स्वतःची छाप सोडणं खूप कठीण आहे. काही विरोधक घोड्याप्रमाणे अडीच घराचं राजकारण करतात. तर काही उंटाप्रमाणे तिरकी चाल चालवतात. मात्र, मला चेकमेट करायचं त्यांचं स्वप्न कधीच साकार होणार नाही.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “गेल्या वर्षी आम्ही राज्याच्या राजकारणामध्ये मोठी क्रांती घडवून आणली होती. त्यानंतर आम्हाला राजकारणातले ग्रँड मास्टर म्हणतात. परंतु, खरे ग्रँड मास्टर विश्वनाथ आनंद आहे. कारण विश्वनाथ आनंद यांनी एकाच वेळी 22 जणांना बुद्धिबळामध्ये हरवले आहे. त्यामुळे खरंतर त्यांनी राजकारणामध्ये यायला हवं. कारण राजकारणामध्ये देखील एकाच वेळी अनेक विरोधकांचा मुकाबला करावा लागतो.”