धबधबे कोसळतात, ओढे वाहतात पावसाळ्यात; मग तेव्हाच बंदी का ?

आमदार किसन कथोरे जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार

अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील पर्यटन स्थळांवर घालण्यात आलेल्या बंदीचा निर्णय अयोग्य बंदी उठवून  पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेता आला पाहिजे, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी भेटून चर्चा करणार असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले.

केवळ पावसाळ्यात ठाणे जिल्ह्यातील नैसर्गिक पर्यटन स्थळांवर पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्याचा निर्णय  गेल्या काही वर्षांपासून सुरू झाला आहे. यंदाही अंबरनाथ तालुक्यातील प्रसिद्ध अशा कोंडेश्वर आणि बारवी धरण परिसरात पर्यटनाला जाण्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसीलदार यांच्या आदेशाने मनाई करण्यात आली आहे. याविरुद्ध  पर्यटक आणि नागरिकांत संताप निर्माण झाला आहे. आमदार कथोरे यांनीही या बंदीविरोधात नापसंती व्यक्त केली आहे.

पावसाळ्यात ओढे, धबधबे असणाऱ्या पर्यटन  ठिकाणी  जाण्यासाठी मुंबई तसेच  उपनगरांतून  मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. मात्र या नैसर्गिक पर्यटन स्थळांवर झालेल्या काही अपघाताच्या घटना घडल्या होत्या , अश्या घटनांवर  खबरदारीचे उपाय योजण्याऐवजी जिल्हा प्रशासनाकडून या निसर्ग पर्यटन ठिकाणी  फिरण्यास पर्यटकांना थेट बंदी घातली जाते आहे. गेल्या चार वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. यंदाही अंबरनाथ तालुक्यातील प्रसिद्ध अशा कोंडेश्वर धबधबा आणि बारवी धरण परिसरात पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे यंदा पुन्हा पर्यटक या नैसर्गिक पर्यटन स्थळांवर जाण्यापासून वंचित राहणार आहेत.

पर्यटन स्थळे विकसित करून पर्यटक गेले नाहीत तर त्याचा काही उपयोग होणार नाही, पर्यटनामुळे ग्रामीण भागाचा विकास होण्याबरोबरच ग्रामस्थांना रोजगार मिळतो, असे आमदार कथोरे म्हणाले, पावसाळ्यात बंदी घालून पर्यटन स्थळे विकसित करून फायदा काय, कोंडेश्वरसारख्या ठिकाणी काही अपघात घडतात, मात्र त्या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त आणि यंत्रणा सज्ज ठेवाव्यात, दोन वर्षे कोरोनामुळे पर्यटन केंद्र बंद होती, त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळू शकला नाही, बंदोबस्त ठेवून समस्या सुटू शकेल, पर्यटन स्थळांवरील बंदीचा निर्णय मागे घ्यावा याबाबत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आमदार कथोरे यांनी सांगितले.