आज ठाणे शहरातील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार

ठाणे : स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर कं.प्रा.लि यांच्यामार्फत देखभाल दुरूस्ती व इतर विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने शुक्रवार २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते शनिवार २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ यावेळेत स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असून ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या योजनेतील उपलब्ध पाणीपुरवठा झोनिंग करुन ठाणे शहरात वितरित करण्यात येणार आहे.

परिणामी शुक्रवार २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, ब्रह्मांड, विजयनगरी, गायमुख, बाळकुम, कोलशेत, आझादनगर, गांधीनगर या भागात पाणीपुरवठा बंद राहील. तसेच शुक्रवारी रात्री ९ ते शनिवारी सकाळी ९ वाजेपर्यंत ऋतू पार्क, जेल, साकेत, रुस्तमजी, समतानगर, आकृती, दोस्ती, जॉन्सन, इटर्निटी, कळवा व मुंब्र्याच्या काही भागात पाणीपुरवठा बंद राहील.

या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.