वाशीमध्ये अतिधोकादायक इमारतींचा पाणीपुरवठा खंडीत

नवी मुंबई: सी विभाग वाशी कार्यक्षेत्रातील सी 1 म्हणजे अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तत्काळ निष्कासित करणे या प्रवर्गात घोषित करण्यात आलेल्या इमारतींचा पाणीपुरवठा खंडीत करण्याची धडक कारवाई नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात आलेली आहे.

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या आदेशान्वये व अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली ही कारवाई वाशी विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त श्री. सागर मोरे यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात आली.

यामध्ये मे. साईदर्शन को. ऑप. हौ. सो. लि. भुखंड क्र. 26, सेक्टर- 14, वाशी येथील 16 फ्लॅट्सचा पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. मे. सुवर्णसागर (VS II) टाईप ओनर्स असोसिएशन भुखंड क्र. 3, सेक्टर-9, वाशीमधील 64 फ्लॅट्सचाही पाणी पुरवठा खंडीत करण्यात आलेला आहे. सी-2/1 ते सी-2/10, सेक्टर-16, वाशी येथील 160 फ्लॅट्सचा पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

अशाप्रकारची धडक मोहीम पाणी पुरवठा विभागाचे तसेच अतिक्रमण विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि अतिक्रमण पोलीस कर्मचारी यांच्या माध्यमातून करण्यात आली. या धडक मोहीमेसाठी सात मजुरांचा वापर करण्यात आला. यापुढील काळातही अशा प्रकारे तीव्र स्वरूपात कारवाई करण्यात येणार आहे.