ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात जल वाहिनी स्थलांतराच्या अत्यावश्यक कामामुळे सोमवार, १५ एप्रिल सकाळी ८ ते मंगळवार, १६ एप्रिल सकाळी ८ वाजेपर्यंत २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
के व्हिला नाला पुलाच्या कामामुळे जेलच्या जलकुंभावरून पाणी पुरवठा करणारी मुख्य वितरण वाहिनी बाधित होणार आहे. त्यामुळे या जलवाहिनीचे स्थलांतर करून जोडकाम करण्यासाठी २४ तासांचा शटडाऊन पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे.
या शटडाऊनमुळे, उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील राबोडी क्र. १ व २, के व्हिला, आकाशगंगा, पंचगंगा, उथळसर, सेंट्र्ल जेल परिसर, पोलीस लाईन, तसेच, नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील एन. के. टी. महाविद्यालय परिसर, खारकर आळी, पोलीस हायस्कूल या भागात सोमवार, १५ एप्रिल सकाळी ८ ते मंगळवार, १६ एप्रिल सकाळी ८ वाजेपर्यंत २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
या शट डाऊननंतर, पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करावा आणि पाणी जपून वापरावे, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.