ठाण्याच्या काही भागात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद

ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रात अत्यंत महत्त्वाचे देखभाल आणि दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे, कटाई नाका ते ठाणे या दरम्यान गुरूवार २४ एप्रिल, २०२५ रोजी रात्री १२ वाजल्यापासून शुक्रवार २५ एप्रिल, २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत एकूण २४ तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

परिणामी, ठाणे महानगरपालिका क्षेत्रात, दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ व ३१ चा काही भाग वगळून) आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये, वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसन नगर नं. २, नेहरू नगर तसेच माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा २४ तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. या पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.