ठाण्यातील काही भागात दोन दिवस पाणीपुरवठा बंद

ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरूत्व वाहिनीवर कटाई नाका ते मुकुंदपर्यंतच्या जलवाहिनीवर देखभाल दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. परिणामी, गुरूवार 26 डिसेंबर 2024 रात्री 12 ते शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर 2024 रात्री 12 वाजेपर्यत एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा-मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा केला जातो. बारवी गुरूत्व वाहिनीवर कटाई नाका ते मुकुंद पर्यंतच्या जलवाहिनीवर देखभाल दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे.

शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेतंर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. 26 व 31 चा काही भाग वगळता ) आणि कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागामध्ये व वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. 2, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.