शुक्रवार-शनिवारी पाणीपुरवठा बंद

ठाणे: ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतील तातडीच्या दुरुस्ती कामांमुळे शुक्रवार, २१ जून रोजी सकाळी ११ वाजल्यापासून शनिवार, २२ जून रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्यावेळी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या काळात स्टेम प्राधिकरणाकडून येणारा पाणीपुरवठा झोनिंग करून सुरू ठेवला जाईल.

शुक्रवार, २१ जून रोजी सकाळी ११ ते रात्री ११ या १२ तासांच्या अवधीत घोडबंदर रोड, साकेत नवीन जलवाहिनी येथील पाणीपुरवठा बंद राहील. तर, शुक्रवार, २१ जून रोजी रात्री ११ ते शनिवार, २२ जून रोजी सकाळी ११ या काळात ऋतूपार्क, जेल, गांधीनगर, समता नगर, सिद्धेश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, मुंबा व कळव्याचा काही भाग येथे १२ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या काळात, पिसे उदंचन केंद्र, टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील उच्च दाब सब स्टेशनमधील कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, फिल्टर बेड वॉल्व्ह दुरुस्ती आदी तातडीची कामे करण्यात येणार आहेत.

या शट डाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून पाणी जपून वापरावे, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.